डॉ. नवनाथ घुगे यांच्या पुढाकारातून भव्य आरोग्य उपक्रम यशस्वी
अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल येथे रविवार, २७ जुलै २०२५ रोजी भव्य मोफत बाल हृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. नवनाथ घुगे यांच्या पुढाकाराने व आयएमए अंबाजोगाई, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), महाराष्ट्र शासन व बालाजी हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात एकूण १५४ बालकांची 2D इको आणि कलर डॉप्लर तपासणी करण्यात आली. यापैकी १४० बालकांना हृदयविकाराचे लक्षण आढळले असून २४ बालकांची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निदान करण्यात आले. या सर्व बालकांवर मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी जाण्या-येण्याचा खर्च, रुग्णालयातील राहण्याची व जेवणाची संपूर्ण सोय देखील बालाजी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नवनाथ घुगे यांनी दिली.
या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक व भाजप नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नवनाथ घुगे होते. या वेळी व्यासपीठावर आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ. राहुल धाकडे, सचिव डॉ. उद्धव शिंदे, बालाजी हॉस्पिटल मुंबईचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीपाल जैन, रोटरी अध्यक्षा प्रा. रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी, RBSK समन्वयक रमेश तांगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना डॉ. घुगे यांनी सांगितले की, “सामाजिक बांधिलकी जोपासत घुगे हॉस्पिटल गेल्या २० वर्षांपासून अतिगंभीर रुग्णांवर उपचार करत आहे. याच भावनेतून जन्मजात हृदय विकार असलेल्या गरजू मुलांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले.” डॉ. श्रीपाल जैन यांनी तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक बालकाची अचूक तपासणी करून त्यांच्या पालकांना आवश्यक मार्गदर्शन व आश्वासन दिले.
या शिबिरात डॉ. संजय राऊत (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ. उल्हास गंडाळ (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, डॉ. सचिन शेकडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोहिते यांनी केले व आभार प्रदर्शन मंजुषा जोशी यांनी केले.
डॉ. घुगे यांनी सांगितले की, अशा प्रकारचे शिबिर गोरगरीब व ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील मुलांसाठी मोठा दिलासा ठरेल. अनेक पालकांच्या चेहऱ्यावर आश्वासक आनंद दिसून आला. शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे अडीच लाख रुपये असताना, ही सेवा पूर्णतः मोफत दिली जाणे ही सामाजिक जबाबदारीची एक उदाहरण आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी आयएमए अंबाजोगाई, रोटरी क्लब, बालाजी हॉस्पिटल, RBSK आणि घुगे हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह अनेक स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.
या उपक्रमामुळे अनेक गरजू मुलांना नवजीवन मिळणार असून, हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.