अंबाजोगाई : अंबाजोगाईत चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्याच घरी चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे. सुनिल लक्ष्मण फड या पोलिस कर्मचाऱ्यासह त्यांच्या किरायेदाराच्या घरात घडलेल्या या चोरीच्या घटनेत सुमारे चार लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
Also Read: अंबाजोगाईतील ग्राहक सेवा केंद्रातील कर्मचाऱ्याने हडपली सहा लाखांची रक्कम; गुन्हा दाखल
ही घटना १९ जुलैच्या रात्रीपासून ते २० जुलैच्या पहाटेच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. सुनील फड हे बर्दापूर पोलीस ठाण्यात अंमलदार असून अंबाजोगाईतील शहरातील मगरवाडी रोडवरील सह्याद्री नगर येथे राहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या पत्नीसह कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्याचवेळी त्यांचे किरायेदार तुकाराम फड हे देखील माहूर येथे रेणुका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. याच दरम्यान त्यांच्या घरात घुसून चोरट्यांनी घरफोडी केली. सुनील फड यांचे किरायदार असलेल्या सुजाता बिरंगणे यांनी पहाटे आपल्या पतीला फोन करून घराच्या खिडकीजवळ संशयित व्यक्ती असल्याची माहिती दिली. यावेळी अशोक बिरंगणे हे स्वतः फड यांच्यासोबत होते.
Also Read: गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
यानंतर त्यांनी वरच्या मजल्यावरील किरायदार धनाजी खाडे यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची खात्री करून घ्यायला सांगितले. धनाजी खाडे यांनी गॅलरीतून खाली पाहिले असता दोन ते तीन अनोळखी व्यक्ती त्यांना दिसल्या. त्यांनी आरडाओरड करताच संबंधित चोरटे पळून गेले. त्यानंतर कॉलनीतील अन्य नागरिक घटनास्थळी आले असता खाडे यांच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केलेला आढळला. नागरिकांनी दरवाजा उघडून पाहणी केली असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसले.
Also Read: वाल्मीक कराडला जोरदार झटका
या चोरीत सुनील फड यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, वापरलेले घड्याळ, कपडे तसेच ओळखीची कागदपत्रे असा मिळून सुमारे दोन लाख तीस हजार रुपयांचा ऐवज तर तुकाराम फड यांच्या घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा दोन लाख वीस हजार रुपयांचा ऐवज असा दोन्हीचा एकत्रित मिळून चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे फड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीनुसार अज्ञात तीन चोरट्यांविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार आनंद शिंदे करत आहेत. दरम्यान, चोरट्यांनी पोलीस कर्मचाऱ्याचे घर फोडून पोलिसांनाच आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.