अंबाजोगाई (प्रतिनिधी) : येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या अपर जिल्हाधिकारी निवासस्थानातून चंदनाचे झाड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या अश्विनी जिरंगे या अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी असून मागील तीन महिन्यापासून त्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील शासकीय निवासस्थानी आपल्या कुटुंबासह राहतात. दि. 23 जुलै 2025 रोजी रात्री साधारणतः 3 वाजता त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारातील अंदाजे 3000 रुपये किमतीचे चंदनाचे छोटे झाड अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
या चोरीची फिर्याद अश्विनी जिरंगे यांनी दिनांक 25 जुलै रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून कलम 303(2) अन्वये भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे यांच्या कडे सोपविण्यात आला असून, शहरातल्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शासकीय वसाहतीत घडलेल्या या चोरीमुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.