Breaking
Updated: फेब्रुवारी 25, 2026
गोदावरी पात्रातील ‘जांभुळ बेटा’स अंबाजोगाईच्या आंतरभारतीची भेट
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई – निसर्गाचा अनमोल ठेवा आणि जैवविविधतेने नटलेल्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील जांभुळ बेट या निसर्गरम्य स्थळाला अंबाजोगाई येथील आंतरभारतीच्या वातीने निसर्गप्रेमींनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान या परिसरातील पर्यावरणीय महत्त्व आणि स्थानिक वनस्पतींचा सविस्तर अभ्यास करण्यात आला.
जेष्ठ पत्रकार अमर हबीब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकला देशमुख, आंतरभरतीच्या अध्यक्ष प्रा.डॉ शैलजा बरूरे व महावीर भगरे यांनी ही अभ्यास सहल आयोजित केली होती.
गोदावरी नदीच्या पात्रात वसलेले जांभुळ बेट हे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेसाठी ओळखले जाते. या बेटावर विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आणि पक्ष्यांचा वावर पाहायला मिळतो. विशेषतः पावसाळ्यानंतर या भागाचे सौंदर्य अधिकच खुलून येते, जे पर्यटकांसह अभ्यासकांनाही आकर्षित करत आहे. जैवविविधता निरीक्षण, बेटावरील वृक्षसंपदा आणि स्थानिक प्रजातींची नोंद करणे. नदीपात्रातील परिसंस्थेचे जतन करण्याबाबत स्थानिक नागरिकांशी संवाद करण्यात आला.
या ठिकाणाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या संधी पडताळून पाहणे. हा क्षेत्र भेटीचा उद्देश होता. या क्षेत्र भेटीदरम्यान पालम परिसरातील ग्रामस्थांनी अभ्यासकांचे स्वागत केले. “जांभुळ बेटासारखी ठिकाणे मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आहेत, मात्र त्यांच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे,” अशी भावना अभ्यासक गटाने व्यक्त केली.
या मोहिमेमुळे अंबाजोगाई आणि परिसरातील निसर्गप्रेमींमध्ये पर्यावरणाविषयी एक नवीन जाणीव निर्माण झाली असून, अशा उपक्रमांमुळे स्थानिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे.