Breaking
Updated: मार्च 18, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: अंबाजोगाईची कन्या आणि सध्या पुण्यात यशस्वी उद्योजिका म्हणून कार्यरत असलेल्या कृषी अभियंता किर्ती दिनेश पुरी यांनी सह्याद्रीतील अत्यंत कठीण आणि थरारक मानला जाणारा हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा रॅपलिंगद्वारे सर करून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय तब्बल १८०० फूट उंचीवरून केवळ जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हा थरारक प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण केला. स्वतःला नवीन आव्हान देण्याच्या प्रेरणेतून त्यांनी हे धाडस केले असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोकणकडा हा आपल्या अवाढव्य अर्धवर्तुळाकार आकार आणि अंगावर येणाऱ्या उंचीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १८०० मीटर उंचीवर असलेल्या या कड्यावरून रॅपलिंग करणे हे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. या अनुभवाविषयी बोलताना किर्ती पुरी यांनी सांगितले की, सुरुवातीला कड्याच्या टोकावर उभे राहिल्यावर मनात थोडी धाकधूक होती, मात्र निसर्गाचे अद्भुत सौंदर्य आणि स्वतःवर असलेल्या अढळ विश्वासामुळे हा टप्पा पार करणे शक्य झाले. हा अनुभव केवळ शारीरिक साहसापुरता मर्यादित नसून मनातील भीतीवर विजय मिळवण्याचा आणि स्वतःची क्षमता ओळखण्याचा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

किर्ती पुरी यांची ही झेप केवळ साहसापुरती मर्यादित नाही, तर त्यांचा व्यावसायिक प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. त्या पेशाने एग्रीकल्चर इंजिनिअर असून पुण्यातील वाकड परिसरात त्यांचे दोन मेडिकल स्टोअर्स आहेत. आता त्या फार्मसी डिस्ट्रिब्यूटरशीपच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत. व्यवसायातील व्यस्ततेतून वेळ काढून त्यांनी जोपासलेली ही साहसाची आवड अनेकांसाठी थक्क करणारी आहे.

सह्याद्रीच्या रांगांमध्ये १८०० फूट उंचीवरून दोरीच्या साहाय्याने खाली उतरताना मिळणारा थरार आणि निसर्गाचा ‘रिव्हर्स वॉटरफॉल’ सारखा नजारा अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी साहस क्षेत्रात मोठ्या संख्येने पुढे यावे आणि आपल्यातील भीतीवर मात करून नवीन आव्हाने स्वीकारावीत, असा सकारात्मक संदेश त्यांनी या निमित्ताने दिला आहे. त्यांच्या या साहसी उपक्रमामुळे अंबाजोगाई आणि पुणे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.