अंबाजोगाई : शहरातील नवा मोंढा भागात बुरगे कृषी सेवा केंद्र या दुकानाचे पत्रे उचकून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुकानमालक ऋषिकेश गणेश बुरगे (रा. ममदापूर, ता. अंबाजोगाई) यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी ऋषिकेश बुरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे बुरगे कृषी सेवा केंद्र हे मोंढा परिसरात मुख्य रस्त्यावरील बडोदा बँकेसमोर आहे. दि. २६ ऑगस्ट रोजी ते दुकान बंद करून गावाकडे केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता दुकान उघडले असता पत्रे उचकटून चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी दुकानातील विविध किटकनाशके, कॅमेरा डीव्हीआर, गल्यातील रोख रक्कम असा एकूण ५८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. त्यासोबतच मालमत्तेचे अंदाजे ५ हजार इतके नुकसान केले आहे.
काही दिवसांपूर्वीच चोरट्यांनी एकाच रात्रीत अंबाजोगाईतील चार दुकाने फोडली होती. शहरात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवून वाढत्या चोऱ्यांवर अंकुश घालावा अशी मागणी होत आहे.