Breaking
Updated: नोव्हेंबर 13, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पहिल्या चार दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. सोमवार, १० नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरू झाली असून गुरुवार, १३ नोव्हेंबरपर्यंत अर्जांची संख्या शून्य असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अंबाजोगाई नगर पालिकेसाठी निवडणुका ४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्या. तब्बल ९ वर्षानंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. अंबाजोगाईत यंदा राजकिशोर मोदी आणि नंदकुमार मुंदडा यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोन्ही मातब्बरांनी आघाड्या करून निवडणूक लढविण्याचे निश्चित केले असल्याने राजकीय पक्ष गौण झाले आहेत. दोन्ही गटांनी अद्याप आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. तर कॉंग्रेसने नगराध्यक्षपदासाठी असिफोद्दिन खातीब वगळता इतर ठिकाणचे उमेदवार अद्याप निश्चित केलेले नाहीत. विशेष म्हणजे सर्वच आघाडी, पक्षांनी आपापल्या पक्षातील संभाव्य उमेदवारांना प्रचाराला लागण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र तरीही यादी जाहीर होत नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यातच अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल करण्यात निरुत्साह दाखवला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर निवडणुकीचे वातावरण अद्याप शांत असून, प्रमुख पक्षांकडून उमेदवार जाहीर होताच नामनिर्देशन प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे.
उमेदवारांची पळापळ, नेत्यांना बंडखोरीची भीती
मोदी-मुंदडा या दोन्ही प्रमुख विरोधी गटांकडे प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची संख्या जास्त आहे. उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता दिसून आल्यास इच्छुक इकडून तिकडे, तिकडून इकडे उड्या मारत आहेत. दोन्ही गटांनी अनेकांना तयारी करण्यास सांगितली असून अद्याप अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. यादी लवकर जाहीर केल्यास बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने याद्या अखेरच्या काही दिवसात जाहीर होण्याची चिन्हे आहेत.
अर्ज सादर करण्यासाठी उरले अवघे तीन दिवस
सोमवार, १० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली आहे. तर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आहे. तसेच त्याच दिवशी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हे अर्ज स्विकारले जाणार आहेत. रविवारच्या दिवशी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आता अवघे तीन दिवस उरले आहेत.
छाननी आणि अर्ज मागे घेणे
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच २१ नोव्हेंबर पर्यंत ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.