Breaking
Updated: सप्टेंबर 24, 2025
अंबाजोगाई आणि केजमध्ये ‘नमो उद्यान’ उभारणीसाठी प्रत्येकी एक कोटींचा निधी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआ. नमिता मुंदडा यांचे यशस्वी प्रयत्न, आधुनिक व सुसज्ज उद्यानांची सुविधा उपलब्ध होणार
अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर परिषद आणि केज नगर पंचायतला “नमो उद्यान” योजनेअंतर्गत प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नगर परिषद आणि नगर पंचायतींमध्ये नागरिकांना आधुनिक व सुसज्ज उद्यानांची सुविधा उपलब्ध करण्यासाठी हा निधी दिला जाणार आहे. या योजनेत केज मतदार संघाचा समावेश होण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी प्रयत्न केले होते.
राशासनाने नुकताच जाहीर केलेल्या विशिष्ट कामांकरिता विशेष अनुदान या योजनेअंतर्गत राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये अंबाजोगाई नगर परिषद आणि केज नगर पंचायत यांचा समावेश असून, प्रत्येक उद्यानावर एक कोटी रुपयांचा खर्च होईल.या उद्यानांना “नमो उद्यान” असे नाव दिले जाणार आहे. विकसित झाल्यानंतर या उद्यानांची राज्यस्तरीय स्पर्धा घेतली जाईल. यात प्रथम क्रमांकाचे उद्यान ठरल्यास संबंधित संस्थेला पुढील कामांसाठी ५ कोटींचा निधी मिळणार असून दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उद्यानांना अनुक्रमे ३ कोटी आणि २ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मिळणार आहे.
या निर्णयामागे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे केज आणि अंबाजोगाई या दोन्ही ठिकाणी नागरिकांसाठी हरित, स्वच्छ व आकर्षक उद्यानांची सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या विश्रांती, मुलांच्या खेळासाठी जागा तसेच आरोग्यवर्धक वातावरण निर्माण करण्यासाठी या योजनेचा मोठा उपयोग होईल. ग्रामीण भागातील नगरपंचायतींना अशा स्वरुपाची सुविधा मिळणे ही एक महत्वाची पायरी मानली जात आहे.
अंबाजोगाई आणि केजचा या योजनेत समावेश केल्याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.