Breaking
Updated: July 7, 2025
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई – सावकारी पाशात अडकलेल्या व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी बीड शहरात घडली. यानिमित्ताने बीड जिल्ह्यात बेसुमार वाढलेल्या अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असलेली अंबाजोगाई देखील आता सावकारांचे शहर म्हणून पुढे येत आहे. अंबाजोगाई शहरात अवैध खाजगी सावकारांचा सुळसुळाट झाला असून, कोणताही कायदेशीर परवाना किंवा सरकारी नोंद न करता हे सावकार गल्लोगल्ली ‘कर्जपुरवठादार’ बनून गरजवंतांचे आर्थिक शोषण करत आहेत.
कमी भांडवलात भरमसाठ रक्कम उकळता येत असल्याने अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दरमहा ५ ते ३० टक्क्यांपर्यंत व्याजाची वसुली करून कर्जदारांना भिकारी करण्याचा उद्योग जोमात सुरू आहे. या लुटमारीतून मिळालेल्या पैशातून गळ्यात सोनसाखळी, हातात सोन्याचे कडे अशा थाटात फिरणाऱ्यांनी फ्लॅट, शेती, बंगले, गाडी अशा अनेक ठिकाणी संपत्तीची गुंतवणूक केली आहे. काहीही कामधंदा करोडपती होण्याच्या या शॉर्टकटची तरुणाईला भुरळ पडत आहे. त्यामुळे शहराच्या गल्लीबोळातून नवनवीन सावकार उदयास येत आहेत.
अद्यापही पतसंस्था, बँका यातून कर्ज मिळण्याची प्रक्रिया किचकट आहे. या संस्था कर्ज देताना पगाराची स्लिप अथवा आयटी रिटर्न भरलेली कागदपत्रे असल्याशिवाय रक्कम मंजूर करत नाहीत. बहुसंख्य सामान्य लोकांकडे या दोन्ही गोष्टी नसतात. त्यामुळे महागाई, बेरोजगारी, आरोग्यखर्च, शैक्षणिक गरजा यामुळे अनेक सामान्य नागरिक, महिला, रिक्षाचालक, लहान-मोठे व्यावसायिक व शेतकरी हे तातडीच्या पैशासाठी खाजगी सावकारांकडे धाव घेतात. याचा गैरफायदा घेत सावकार कोणतेही कायदेशीर दस्तऐवज न करता, त्यांच्याकडून चेक, आधारकार्ड, बँक पासबुक, मालमत्तेची कागदपत्रं घेतात आणि भरमसाठ व्याजाच्या बोलीवर कर्ज देतात.
हप्ते थकले की धमक्या सुरू
हप्त्यांच्या परतफेडीला थोडासा उशीर झाला, तर हे सावकार गुंडांना सोबत घेऊन दरवाज्यावर येतात. कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन धमक्या दिल्या जातात. अनेकांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले जाते. शिवीगाळ, मारहाण, आणि ब्लँक चेकद्वारे फसवणूक करून आणखी पैसे उकळले जातात. ही एक प्रकारची आर्थिक गुन्हेगारी असून, तिच्यावर कोणताही कायदेशीर अंकुश नाही.
व्याजाच्या बोजात बुडालेली आयुष्यं
अनेक जण सुरुवातीला थोड्याच रकमेसाठी कर्ज घेतात, पण वाढत्या व्याजासह परतफेड करणे शक्य न झाल्याने त्यांची संपूर्ण मालमत्ता विकावी लागते. काही प्रकरणात तीन महिन्यात दामदुप्पट होते. ठरलेल्या वेळेत पैसे आले नाहीत तर सावकाराकडून जमीन, शेती स्वतःच्या नावावर करून घेतली जाते. व्याजात बुडालेल्या अनेक कर्जदारांनी शेतजमीन, प्लॉट, घरे गमावली आहेत. काही जणांना तर गाव सोडावे लागले असून, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येच्या घटना देखील घडत असल्याच्या तक्रारी आहेत.
भिशीमार्फत चालते सावकारी
मंडळे, काही बचतगट यांच्यामार्फत भिशी चालवली जाते. त्यापैकी काही भिशींतून आठवड्यावर पैसे दिले जातात. त्याची आकारणी १५ ते २५ टक्के असल्याचे बोलले जाते. एखाद्या आठवड्यात हप्ता चुकला तर चक्रवाढ व्याज लावण्यात येते.
प्रशासनाचे दुर्लक्ष?
या सावकारांकडून कोणतीही नोंदणी, परवाना किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती शासनाला दिली जात नाही. पोलिस व महसूल प्रशासनाकडेही यावर ठोस कारवाईची मागणी वारंवार होत असूनही, आजतागायत ठोस पावले उचललेली दिसून येत नाहीत. अवैध सावकारी ही केवळ एक आर्थिक बाब नसून, ती समाजातील गरीब व मध्यमवर्गीयांचे जीवन उद्ध्वस्त करणारी एक गंभीर समस्या बनली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष, राजकीय अभय यामुळे बिनधास्तपणे सावकारांचे नेटवर्क विस्तारत आहे. प्रशासनाने अशा अवैध सावकारी विरोधात मोहीम राबवावी आणि सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.