केज : सारुळ गावाजवळील केज रोडवरील रेणुका कलाकेंद्रात चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) बीड यांनी कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी मीना संतोष खराडे, शेख शफीक शेख हमीद आणि जागामालक रामनाथ ढाकणे (फरार) यांच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ५ ऑगस्ट रोजी करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव (AHTU, बीड) यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सारुळ गावातील रेणुका कलाकेंद्रात दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. सदर माहितीच्या आधारे देविदास गात, पीएसआय पल्लवी जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा रेडेकर, महिला पोलीस हवालदार उषा चौरे, शोभा जाधव, पोलीस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोलीस शिपाई प्रदीप वीर व योगेश निर्धार यांनी डमी ग्राहक व पंचासह सापळा रचून छापा टाकला.
डमी ग्राहकाने कलाकेंद्रात पोहोचल्यावर तेथील महिला एजंट मीना संतोष खराडे (वय ४०, रा. जुना धानोरा रोड, जीजाऊ नगर, संत कबीर गल्ली, बीड) हिने वेश्यागमनासाठी होकार देत ७,५०० रुपयांची मागणी केली. ठरलेली रक्कम देताच पोलिसांना इशारा मिळाल्यावर छापा टाकण्यात आला. मीना खराडे हिच्याकडून दिलेली रक्कम जप्त करण्यात आली.
सदर ठिकाणी दोन पीडित महिला मिळून आल्या. त्यांच्याकडून चौकशी केली असता, आरोपी मीना संतोष खराडे, शेख शफीक शेख हमीद (वय ३१, रा. कुर्बाण अलिशा नगर, दर्गा रोड, परभणी) आणि जागामालक रामनाथ ढाकणे (वय ५९, रा. सारुळ) यांनी त्यांना गुजरात व अन्य जिल्ह्यातून आणून आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेऊन वेश्या व्यवसाय करायला लावल्याचे समोर आले.
सदर घटनेत तीन आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ आणि ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अ.मा.वा.प्र. कक्षाच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्धपणे व तडीने ही कारवाई करून महिलांची सुटका करत वेश्याव्यवसायाच्या विळख्यातून त्यांची मुक्तता केली आहे.