Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईच्या ‘एसआरटी’चा कायापालट होणार; आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्यामुळे ‘मास्टर प्लॅन’ला गती

Updated: डिसेंबर 13, 2025

By Vivek Sindhu

आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्यामुळे 'मास्टर प्लॅन'ला गती

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई / नागपूर: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (एसआरटी) ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे ‘मास्टर प्लॅन’च्या कामाला आता वेग आला आहे. यासंदर्भात नागपूर येथील विजयगड येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
एसआरटी रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी आमदार नमिता मुंदडा या शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत त्यांनी रुग्णालयाच्या विकासाचा रोडमॅपच मांडला. अंबाजोगाई आणि परिसरातील नागरिकांना मिळणारी आरोग्यसेवा अधिक दर्जेदार व्हावी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या. रुग्णालयाचा भौतिक विस्तार, आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीची उपलब्धता आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन भविष्यातील गरजांवर आधारित आराखडा तयार करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
यावेळी उपस्थित तांत्रिक अधिकाऱ्यांनी एसआरटीच्या सद्यस्थितीचे आणि प्रस्तावित विकासाचे सादरीकरण केले. आमदार नमिता मुंदडा यांच्या आग्रही भूमिकेची आणि सूचनांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीत गती आणण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ऑनलाईन माध्यमातून बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसआरटीचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, आर्किटेक्ट रंजीत नागेशकर आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आ. नमिता मुंदडा यांच्या या भागीरथ प्रयत्नांमुळे लवकरच अंबाजोगाईकरांना सुपरस्पेशालिटी दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Categories

Recent Posts