Breaking

धारूर घाटात ३०० फूट खोल दरीत कोसळला टँकर

Updated: मार्च 9, 2026

By Vivek Sindhu

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

धारूर: हैदराबादहून छत्रपती संभाजीनगरकडे कच्चा माल घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू टँकरला धारूर घाटातील धोकादायक वळणावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट ३०० फूट खोल दरीत कोसळले. दरीत कोसळताच टँकरला भीषण आग लागली, मात्र चालक महादेव बिक्कड यांनी वेळीच उडी मारल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ जे ४६०० क्रमांकाचा टँकर आपला प्रवास पूर्ण करत असताना धारूर घाटातील एका तीव्र वळणावर पोहोचला. तिथे अचानक ब्रेक निकामी झाल्याने टँकर नियंत्रणाबाहेर गेला. प्रसंगावधान राखून चालकाने टँकरमधून उडी घेतली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत टँकरमधून धुराचे लोट निघत होते. जखमी चालकावर केज येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

धारूर घाट सध्या वाहनचालकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मागील एका वर्षात या घाटात ट्रक आणि टँकर दरीत कोसळण्याच्या किमान पाच ते सहा घटना घडल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घाटाचे तातडीने रुंदीकरण करावे आणि सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रभावी पावले उचलली न गेल्याने भविष्यात अधिक गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.


Categories

Recent Posts