Breaking
Updated: जानेवारी 5, 2026
साखर कारखान्यातील मिक्सरमध्ये अडकून महिला कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; अंबाजोगाई येथील धक्कादायक घटना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील अंबा साखर कारखाना परिसरात एका ५० वर्षीय महिला कामगाराचा यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शोभा विठ्ठल बनसोडे असे या मृत महिलेचे नाव असून, त्या कारखान्यात साफसफाईचे काम करत होत्या. १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास कारखान्यातील साखरेच्या मिक्सरमध्ये त्यांच्या साडीचा पदर अचानक अडकला. यामुळे त्या वेगाने फिरणाऱ्या मिक्सरला जाऊन धडकल्या, ज्यामध्ये त्यांच्या पोटाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ३१ डिसेंबर २०२५ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत महिलेचे पती विठ्ठल नामदेव बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. या दुर्घटनेबाबत नातेवाईकांनी कोणतीही तक्रार किंवा संशय व्यक्त केलेला नाही. पोलिसांनी कलम १९४ अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.