Breaking

माणुसकीला काळिमा! परळी बसस्थानकावर दीड वर्षांच्या चिमुरडीला वाऱ्यावर सोडून आई पसार

Updated: मार्च 27, 2026

By Vivek Sindhu

IMG 20260327 WA0052

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: पोटच्या गोळ्याचा सांभाळ करण्याऐवजी त्याला बेवारस सोडून निघून जाण्याची हृदयद्रावक घटना परळी शहरात उघडकीस आली आहे. परळी बसस्थानक परिसरात दीड वर्षाच्या मुलीला सोडून एक अज्ञात महिला पसार झाली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सालोमन मायकल कसबेकर (वय ५२, रा. चिद्रावार नगर, जुनापेडगाव रोड, परभणी) यांनी या प्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कसबेकर हे परभणी येथील आशा शिशुगृहात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मिरा विकास बोराडे आणि जयश्री बालाजी दिवटे या महिला परळी बसस्थानकावर बसची वाट पाहत होत्या. त्याच वेळी तोंडाला रुमाल बांधलेली एक अज्ञात महिला तिथे आली आणि आपली दीड वर्षांची मुलगी या महिलांजवळ सोपवून ‘बाथरूमला जाऊन येते’ असे सांगून निघून गेली. बराच वेळ होऊनही ती महिला परतली नाही. दोन्ही महिलांनी बसस्थानक परिसरात तिचा शोध घेतला, मात्र ती कोठेही आढळून आली नाही.

मुलीला एकटे सोडू नये या भावनेतून त्या महिलांनी तिला आपल्या सोबत नेले आणि ५ फेब्रुवारी रोजी परभणी येथील आशा शिशुगृहात आणून सोडले. शिशुगृहाचे अधीक्षक सालोमन कसबेकर आणि सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र कांबळे यांनी परळी परिसरात शोध घेऊनही मुलीच्या नातेवाईकांचा पत्ता लागला नाही. अखेर ही मुलगी जाणीवपूर्वक बेवारस सोडल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत धाव घेण्यात आली.

या प्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाणे येथे अज्ञात महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ९३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे करत आहेत. पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक संबंधित महिलेचा शोध घेत आहे.


Categories

Recent Posts