Breaking
Updated: मार्च 27, 2026
परळीत रामनवमी मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel
परळी: प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रा मिरवणुकीत पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी परळी शहर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिरवणुकीत साऊंड सिस्टीम किंवा डिजे वाजवू नये, अशा स्वरूपाची लेखी नोटीस आधीच देण्यात आली होती, मात्र त्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.या प्रकरणी पोलीस अंमलदार विष्णू उद्धव फड (वय ३२, नेमणूक परळी शहर पोलीस ठाणे) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात शोभायात्रा मिरवणुकीचे अध्यक्ष नितीन माणिकराव बागवाले (रा. हनुमाननगर, परळी) आणि ट्रॅक्टर चालक सचिन राजेंद्र भोईटे (वय ३९, रा. वदक वस्ती, माळेगाव, जि. पुणे) यांना आरोपी केले आहे. २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान वैद्यनाथ मंदिर ते एकमिनार चौक या मार्गावर ही मिरवणूक काढण्यात आली होती.मिरवणुकीदरम्यान आरोपींनी ट्रॅक्टर क्रमांक MH 44 D 3540 वर मोठ्या आकाराचे साऊंड स्पीकर लावून सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तसेच मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मोठ्या आवाजात गाणी वाजवून पोलीस निरीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २८५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(१)(n), ३३(१)(r)(iii) व १३१ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार किशोर कचरू घाटमल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.