आडस येथे वीज पडून शेळी ठार, दोन शेळ्या जखमी
केज - बाभळीच्या झाडावर वीज कोसाळल्याने या झाडाखाली थांबलेल्या शेळ्यांपैकी एक शेळी जागीच मरण पावली. तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्याची घटना आडस ( ता. केज ) येथे शनिवारी ( दि. २३ ) दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.
आडस येथील शेतकरी वैजनाथ दगडुअप्पा आकुसकर यांची अंबाजोगाई रस्त्यावर शेती आहे. ते शेतात असताना दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी शेतात चरत असलेल्या तीन शेळ्या बाभळीच्या झाडाखाली थांबल्या होत्या. याचवेळी अचानक विज कडाडून बाभळीच्या झाडावर कोसळली. यावेळी बाभळीच्या झाडाखाली थांबलेली एक शेळी जागीच मरण पावली असून दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या गंभीर जखमी झालेल्या दोन्ही शेळ्या सकाळपर्यंत जगतील म्हणून खात्री देता येत नसल्याची माहिती शेतकरी वैजनाथ आकुसकर यांनी दिली. एक शेळी मरण लावल्याने शेतकऱ्याचे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती महसूल विभागास देण्यात आली होती.