१८ हजाराची गावठी दारू पकडली, १३ हजाराचे रसायन नष्ट केले
केज - केज पोलिसांनी शहरातील क्रांतीनगर व येवता येथील पारधी वस्तीवर छापा मारून १७ हजार ८०० रुपयांची गावठी दारू जप्त करीत १३ हजार रुपयांचे दारू निर्मितीचे रसायन नष्ट केले. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशावरून फौजदार राजेश पाटील, जमादार रुक्मिण पाचपिंडे, बाळासाहेब अहंकारे, पोलीस नाईक त्रिंबक सोपणे यांच्या पथकाने २२ सप्टेंबर रोजी ३.३० वाजेच्या सुमारास शहरातील क्रांतीनगर भागात छापा मारला. यावेळी तोळाबाई प्रभु काळे ही तिच्या घराचे बाजुला शेडमध्ये गावठी हातभट्टीची तयार दारु विक्री करीत होती. पोलिसांना पाहून तिने धूम ठोकली. पोलिसांनी ९ हजार ५०० रुपयांची गावठी दारू व ड्रम जप्त करीत दोन ड्रममध्ये असलेले १३ हजार रुपयांचे गावठी दारू करण्याचे ४०० लिटर रसायन नष्ट केले. जमादार रुक्मिण पाचपिंडे यांच्या तक्रारीवरून तोळाबाई काळेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या कारवाईत सहाय्यक फौजदार राजू वाघमारे, जमादार महावीर सोनवणे, राजू वंजारे, रुक्मानंद घोलप यांच्या पथकाने २२ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास येवता येथील पारधी वस्तीवर छापा मारला. मंजुळा संजय काळे ही महिला गावठी दारू विक्री करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहून पळून गेली. यावेळी पोलिसांनी ८ हजार ३०० रुपये किंमतीची १६० लिटर गावठी दारू जप्त केली. जमादार महावीर सोनवणे यांच्या तक्रारीवरून मंजुळा काळेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.