Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

पिकांचे आरोग्य देखरेख प्रणाली निरीक्षणे नोंदवण्याबाबत समूह सहाय्यकांना मार्गदर्शन

अंबाजोगाई  - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या वतीने शेतीमधील विविध कार्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला जात आहे. त्यापैकी एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान. पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये महत्त्वाचा अडसर म्हणजे पिकावर येणाऱ्या रोग आणि किडी होत. हवामान बदलाचा पिकाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे तसेच बदलत्या हवामानामुळे विविध पिकावर येणाऱ्या कीड आणि रोगांची माहिती संकलित करून त्या त्या परिस्थितीमध्ये विविध पिकावर येणाऱ्या कीड आणि रोग यांच्या अभ्यासावरून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल मध्ये विविध पिकांमधील कीड आणि रोग यांची निरीक्षणे ओळखता यावीत व त्यांचे व्यवस्थापन करणे संदर्भातील हवामान आधारित सल्ला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी पोकरा प्रकल्पांतर्गत क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग सिस्टिम (सीएचएमएस) अर्थात पिकाचे आरोग्य देखरेख प्रणाली उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय अंबाजोगाई अधिनस्त केज परळी अंबाजोगाई तालुक्यातील समूह सहाय्यकांच्या माध्यमातून सोयाबीन, कापूस, तूर पिकावरील कीड आणि रोगांची निरीक्षणे संकलित करण्यात येत आहेत. कीड आणि रोगांच्या निरीक्षणाचे संकलन संदर्भात आढावा घेण्याच्या अनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी शरद शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत समूह सहायकांना उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी सीएचएमएस उपक्रमांतर्गत झालेल्या कामाची माहिती देऊन समूह सहाय्यकांच्या अडचणी जाणून घेऊन पोकरा एफएफएस ऍप्लिकेशन वर कीड आणि रोगांची निरीक्षणे घेताना घ्यावयाची काळजी संदर्भातील प्रशिक्षण दिले तसेच सोयाबीन, कापूस, तुर पिकामधील कीड आणि रोग यांची निरीक्षणे हस्त पत्रकांच्या माध्यमातून दाखवून किडींची व रोगांची ओळख समूह सहाय्यकांना करून दिली. उपविभागीय कृषी अधिकारी शिनगारे यांनी समूह सहाय्यकांना वेळोवेळी गावांना भेटी देऊन सीएचएमएस उपक्रमासाठी कीड रोगांची निरीक्षणे प्रकल्पाच्या ऍप्लिकेशन वर अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या. सदर आढावा बैठकीला लेखा अधिकारी सुरेश ढाकणे, प्रकल्प सहाय्यक प्रताप मुंडे आणि समूह सहाय्यक उपस्थित होते.

Saturday 23rd of September 2023 12:24 PM

Advertisement

Advertisement