तालुकास्तरीय स्पर्धेत वसंतराव नाईक प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेचे यश
शाळेचे तीन विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- नुकत्याच अंबाजोगाई येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी व बुद्धीबळ स्पर्धेत वसंतराव नाईक प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत क्रीडा क्षेत्रात अंबाजोगाई शहराचे नांव उंचावले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तीन विद्यार्थी पात्र ठरल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
मागील काही वर्षांपासुन शहरातील वसंतराव नाईक प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानी क्रिडा स्पर्धेतून विविध पारितोषिके पटकाविली आहेत. नुकत्याच अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेतील लांब उडी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात कु.पायल विकास आडे (प्रथम) व कु.पायल नवनाथ राठोड (तृतीय) या विद्यार्थीनींनी दमदार कामगिरी करीत पारितोषिके पटकाविली. त्यांची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बुधवार, दि.20 सप्टेंबर रोजी अंबाजोगाईत आयोजित तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात शाळेचा रोहित माणिक तिडके या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्याची ही निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रिडा शिक्षक प्रविण उत्तमराव ठोंबरे, शिक्षक एन.एम.मुंडे, आर.व्ही.गुट्टे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगिरी करीत प्राप्त केलेल्या पारितोषिकांबद्दल समाधान व्यक्त करून सदरील विद्यार्थ्यांचे कौतुक करीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल रामधन राठोड, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एस.ए.राठोड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस.आर.राठोड यांनी अभिनंदन केले आहे.