त्रास देणाऱ्या दारुड्या बापाला डोक्यात लाकूड मारून मुलाने संपवले
माजलगाव तालुक्यातील घटना; तोंडाला पिशवी बांधून मृतदेह इंद्रायणीत फेकला
माजलगाव - परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलिसांना इंद्र्यानी नदीवरील पुलाच्या खाली पाण्यात अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या अंगावरील गोंद्लेल्या नावावरून पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. दारुड्या पित्याच्या त्रासाला कंटाळून मुलानेच त्यांच्या डोक्यात लाकडाने मारहाण करून खून केल्याचे उघड झाले आहे. मुंजा एकनाथ कटारे (वय ५२, रा. दिंद्रुड, ता. माजलगाव) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी दैठणा येथील पोलीस उपनिरिक्षक संजय वळसे यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि.१६) त्यांना दैठणा - गंगाखेड महामार्गावर इंद्रायणी नदीवरील पुलाच्या खाली पाण्यात अनोळखी मृतदेह आढळून आला होता. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कुजलेला मृतदेह पाण्याबाहेर काढला असता त्याच्या हातावर मुंजा एकनाथ कटारे असे गोंदलेले आढळून आले. शवविच्छेदनात सदरील प्रकार खुनाचा असयाचे निष्पन्न झाले. नाव आणि छायाचित्राच्या आधारे शोध घेतल्यानंतर मृत व्यक्ती माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मयत मुंजा कटारे यांचा मुलगा अशोक याच्या हालचाली आणि हावभाव संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. सुरुवातील उडवाउडवीची उत्तरे देणारा अशोक पोलीसा खाक्या दाखवताच सरळ झाला आणि त्याने वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. मुंजा यास दारूचे व्यसन होते आणि ते नाह्मी तरस देत होते. १२ सप्टेंबर रोजी गावातील एका शाळेजवळ वडील पुन्हा मद्यधुंद अवस्थेत दिसून आल्याने अशोकने रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत मुंजा यांचा मृत्यू झाला. हि बाब लक्षात येताच अशोकने त्यांचे रक्त सांडू नये म्हणून त्यांच्या नाग्वरील कपड्याने डोक्याला आणि चेहऱ्यावर घट्ट बांधले आणि त्यावरून पोलीथीनच्या पिशव्या बांधल्या. त्यानंतर स्वतःच्या कारमधून (एमएच ०२ डी. एन. २९४१) मृतदेह इंद्रायणी नदीच्या पुलावरून खाली पाण्यात फेकला.