Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

स्वाराती रुग्णालयाच्या शीत शवागारात फक्त चारच शवपेट्या

नवीन १४ शीत पेट्यासाठी ४ वर्षात १४ प्रस्ताव, १५ स्मरणपत्रे; तरीही घेतली जात नाही दखल

अंबाजोगाई - येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाने १२ वर्षापूर्वी खरेदी केलेल्या १४ शीत शवपेट्यांपैकी १० पेट्या गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाल्याने आता फक्त ४ शव शीत पेट्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आणखी नव्याने १४ शव शीत पेट्या मिळाव्यात म्हणून स्वाराती प्रशासनाने मागील ४ वर्षात १४ प्रस्ताव आणि १५ स्मरणपत्रे पाठवली असून मागील ४ वर्षांपासून  केवळ मंजुरीअभावी हा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. त्यामुळे शवविच्छेदन केलेले आणि अपघात घडल्यानंतर रुग्णालयात ऐनवेळी आलेले मृतदेह व शवविच्छेदन झालेले मृतदेह स्वारातीमधील शरीररचनाशास्त्र विभागाने तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या आठ शीत शवपेट्यांत ठेवावे लागत आहेत. बीडसह चार जिल्ह्यांतून येथील स्वाराती ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण उपचारासाठी येतात. दररोज बाह्य रुग्णांची संख्या अडीच हजार असून आंतररुग्णांची संख्या एक हजार आहे. अंबाजोगाई शहराच्या ५० किलोमीटर अंतरावर कुठेही दुर्घटना घडली की त्या व्यक्तीस या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते.

 या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या अत्यावस्थ रुग्णांच्या मृत्युची संख्या याशिवाय स्नेक बाइट, विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेले रुग्ण आणि आजूबाजूच्या परिसरातील अपघातात मृत झालेले नागरीक या सर्वांच्या शव विच्छेदनाची जबाबदारी ही या वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर रचना शास्त्र विभागावर येते. यामुळे या रुग्णालयात मृत झालेल्या रुग्णांची दररोजची संख्या तशी मोठी आहे. या मृत झालेल्या रुग्णांचे मृतदेह शव शीत गृहात ठेवून त्यांचे शव विच्छेदन करुन ते संबंधितांच्या नातेवाईकांना पोहोचेपर्यंत बराच वेळ लागण्याची शक्यता असते. म्हणून हे सारे मृतदेह सुरक्षीत व सुस्थितीत ठेवण्यासाठी शव शीतगृहात किमान १८ शव शीतपेट्यांची आवश्यकता आहे. 

 स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर रचना शास्त्र विभागाच्या नियंत्रणाखाली असलेले हे शव शीत गृह हे आजही निजामकालीन बांधण्यात आलेल्या इमारतीत आहे. सदरील इमारत ही वापरण्यास आयोग्य असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला असला तरी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या वतीने ६ कोटी ५० लाख रुपयांच्या शरीर रचना शास्त्र विभागाच्या मंजुर असलेल्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही न झाल्यामुळे केवळ नाईलाजास्तव हा शव विच्छेदन विभाग या इमारतीत सध्या वैद्यकीय महाविद्यालया चालवावा लागत आहे.

४ वर्षांत १४ प्रस्ताव, १५ स्मरणपत्र

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व  रुग्णालयाच्या वतीने २०१८ पासुन आज पर्यंत या मागणी बाबतीचे १४ प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत. तरीही मागील चार वर्षांपासून या प्रस्तावाचा विचार मंत्रालयाने आजपर्यंत केला नाही. 

वैद्यकीय महाविद्यालयाने यापुर्वी सन २०१८-२०१९ मध्ये ६, २०२०-२०२१ मध्ये ४, २०२२-२०२३ मध्ये ४ असे एकूण १४ शीत शवपेट्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले असून चार वर्षांमध्ये रुग्णालय प्रशासनाकडून शासनाला १५ स्मरणपत्रे पाठवण्यात आली. चार वर्षांमध्ये एकाही पेटीला मंजुरी मिळालेली नाही. एका शीतपेटीसाठी किमान अडीच लाख रुपये खर्च आहे.

 दररोज सरासरी ५ शवविच्छेदने

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दररोज किमान ५ मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते. रात्रीच्या वेळी रुग्णालयात येणारे मृतदेह शीत शवपेटीतच ठेवावे लागतात.

 शीतपेट्या नसल्याने काय येत आहेत अडचणी?

स्वाराती रुग्णालयात सध्या दहा शीतपेट्यांची गरज आहे. रुग्णालयात आलेला मृतदेह जर शीतपेटीत ठेवता आला नाही तर मृतदेहांची दुर्गंधी येऊन मृतदेह सडण्याचा धोका असतो. अनेक वेळा तर शवविच्छेदनासाठी काही कारणास्तव वेळ लागतो. अनेक वेळी तर मृत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयात येतच नाहीत. त्यामुळे मृतदेह कांहीं दिवस शीतपेटीतच ठेवावा लागतो. स्वाराती रुग्णालयात बारा वर्षांपूर्वी १४ शीतपेट्या खरेदी करण्यात आल्या होत्या. पैकी १० शीतपेट्या खराब झाल्याने आता केवळ ४ शीतपेट्याच शिल्लक आहेत.

 पाठपुरावा सुरू आहे - अधिष्ठाता
"स्वारातीमध्ये येणारे मृतदेह ठेवण्यासाठी शीत शवपेटी हा महत्त्वाचा भाग आहे. सध्या रुग्णालयात पेट्यांची कमतरता असल्याने शासनाकडे हा प्रस्ताव पाठवला असून लवकरात लवकर पेट्या मिळाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय
 आ. मुंदडा यांची मागणी
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात फक्त ४ शव शीत पेट्या चालु असून बंद पडलेल्या १० शव शीत पेट्या तात्काळ उपलब्ध करून होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी मी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. सदरील मागणीचा पाठपुरावा सुरु आहे.
- आ. नमिता मुंदडा, विधानसभा सदस्य, केज

Thursday 12th of May 2022 01:52 PM

Advertisement

Advertisement