Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अनोळखी युवतीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळविला!

परळी : तुझ्या बहिणीबद्दल बोलयाचे आहे सांगून पूजा चव्हाणच्या बहिणीला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका युवतीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. ही घटना गुरुवारी (दि.०४) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास परळीतील फौंडेशन शाळेजवळ घडली. याप्रकरणी परळी शहर ठाण्यात शुक्रवारी (दि.०५) त्या अनोळखी युवती विरोधात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, ती युवती कोण आणि तिने पूजाच्या बहिणीच्या मोबाईल का पळविला? चोरी करण्यासारखे त्या मोबाईलमध्ये काय विशेष होते असे प्रश्न आता निर्माण होऊ लागले आहेत. 

'विवेक सिंधू न्यूज'चे अँड्राॅईड‌ ‌‌मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. अद्याप पूजाच्या आत्महत्येमागचे गूढ उलगडलेले नाही. त्यातच गुरुवारी पुजाची बहिण दिव्यांगी लहू चव्हाण हिचा मोबाईल चोरण्यात आला आहे. दिव्यांगी सध्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे कि, गुरुवारी सायंकाळी साडेसह वाजताच्या सुमारास ती आणि तिचा मित्र सौरभ कराड हे दोघे वाकिंगसाठी परळीतील हनुमान गड परिसरात गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता परत येत असताना दिव्यांगीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून एक कॉल आला. मला तुझी बहिण पूजाबद्दल बोलायचे आहे असे समोरून बोलणाऱ्या अनोळखी युवतीने तिला सांगितले. थोड्यावेळाने फौंडेशन शाळेजवळ भेटण्याचे त्यांचे ठरले. दिव्यांगी आणि सौरभ रात्री साडे आठ वाजता शाळेजवळ आले. त्यानंतर त्या अनोळखी युवतीने त्यांना कॉल करून शाळेच्या दुसऱ्या गेटजवळ बोलावले. तिथे तोंडाला स्कार्फ बांधलेली आणि काळ्या रंगाची जर्किन घातलेली एक मुलगी अंधारात उभी होती. तिच्याशी बोलत असताना दिव्यांगीच्या मोबाईलवर तिचा भाऊ संग्राम याचा कॉल आला. तो कॉल घेत असताना त्या अनोळखी युवतीने दिव्यांगीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि दुसऱ्या गेटच्या दिशेने पळून जावू लागली. तेंव्हा दिव्यांगी आणि सौरभने तिचा पाठलाग केला, परंतु काही अंतरावर उभ्या असलेल्या एका दुचाकीस्वाराच्या मागे बसून ती पळून गेली. 

 ‘त्या’ मोबाईलमध्ये दडलंय काय?

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात अनेक प्रश्नांची अद्याप उकल झाली नसताना दिव्यांगीच्या मोबाईलची चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरी करणारी ती युवती कोण होती? काही न बोलता तिने मोबाईलच लंपास का केला? तिला पूजाबद्दल नेमके काय सांगायचे होते? कि, ती फक्त मोबाईल घेण्यासाठीच आली होती? चोरी करण्यासारखे त्या मोबाईलमध्ये विशेष काही होते का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत.

Friday 5th of March 2021 11:27 PM

Advertisement

Advertisement