Breaking
Updated: एप्रिल 24, 2026
लाखोंच्या नुकसानीची भीती
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज तालुक्यातील शेतकरी आधीच अवकाळी आणि बाजारभावाच्या संकटात होरपळत असताना, आता माकडांच्या टोळ्यांमुळे नव्या समस्येला तोंड देत आहेत. लाखो रुपये खर्च करून शेतात बसवलेल्या सोलर पंपाच्या पॅनलवर माकडे उड्या मारत असल्याने पॅनल फुटून मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि भूजल पातळी खालावल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकरी सिंचनासाठी सोलर पंपावर अवलंबून आहेत. शासनाच्या अनुदानातून आणि काहींनी कर्ज काढून 2 ते 3 लाख रुपये खर्च करून हे पंप बसवले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून माकडांच्या टोळ्या शेतात घुसून सोलर पॅनलवर बसत आहेत, उड्या मारत आहेत. त्यामुळे पॅनलला तडे जाण्याचे, काचा फुटण्याचे प्रकार वाढले आहेत.
शेतकऱ्यांची व्यथा: “आनेक शेतकर्यांनी कर्ज काढून सोलर बसवले आहेत. पाणी मिळेल, दोन पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण आता ही माकडं रोज येतात. पॅनलवर बसतात, उड्या मारतात. एक पॅनल फुटला तर 15 ते 20 हजार रुपये दुरुस्तीला लागतात. वॉरंटी पण लागत नाही. आम्ही रोज राखण करायची का?” असा संतप्त सवाल सारणी येथील शेतकरी आणि पत्रकार दिनकर जाधव यांनी उपस्थित केला.
सोलर पॅनल फुटल्यास पंप बंद पडतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देणे अशक्य होते. आधीच ज्वारी, बाजरी, भाजीपाला करपण्याच्या मार्गावर आहे. त्यात सोलर बंद पडल्यास संपूर्ण पीक वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या समस्येवर वनविभागाने तातडीने लक्ष घालावे. माकडांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा किंवा शेतकऱ्यांना सोलर पॅनल संरक्षित करण्यासाठी जाळी बसवण्यास अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. तसेच, नैसर्गिक आपत्तीप्रमाणे माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीलाही शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.