Breaking

रस्त्यावर सरपण ठेवल्याच्या वादातून शिरूर कासारमध्ये हाणामारी; चौघांविरुद्ध गुन्हा

Updated: एप्रिल 24, 2026

By Vivek Sindhu

रस्त्यावर सरपण ठेवल्याच्या वादातून शिरूर कासारमध्ये हाणामारी; चौघांविरुद्ध गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरूर कासार: रस्त्यावर सरपण का ठेवले, या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका शेतकरी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची घटना लिंबा येथे घडली आहे. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील फिर्यादी पंडीत हिराजी नागरगोजे (वय ५५, रा. लिंबा, ता. शिरूर कासार) हे आपल्या घरासमोर असताना आरोपी शिवाजी तुकाराम नागरगोजे हा तेथे आला. त्याने रस्त्यावर सरपण का ठेवले, आम्हाला येण्याजाण्यासाठी रस्ता नाही, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. वाद वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादीला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा गोंधळ ऐकून फिर्यादीचे आई-वडील बाहेर आले असता, आरोपी चरण शिवाजी नागरगोजे याने फिर्यादीच्या वडिलांच्या पायावर दगड मारून त्यांना जखमी केले. तसेच अनसाबाई तुकाराम नागरगोजे हिने फिर्यादीच्या आईला काठीने मारहाण केली, तर अविनाश शिवाजी नागरगोजे याने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पंडीत नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी तुकाराम नागरगोजे, चरण शिवाजी नागरगोजे, अनसाबाई तुकाराम नागरगोजे आणि अविनाश शिवाजी नागरगोजे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.


Categories

Recent Posts