Breaking
Updated: एप्रिल 24, 2026
रत्नाकर निकम: अंबाजोगाईच्या मातीतील एक ध्येयवेडा शिक्षक, छायाचित्रकार आणि निसर्गमित्र
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाईतील एक संवेदनशील शिक्षक, छायाचित्रकार आणि पर्यावरणाचे रक्षक म्हणून ओळखले जाणारे रत्नाकर जगन्नाथ निकम आज त्यांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान शिक्षकी सेवेतून अधिकृतपणे निवृत्त होत आहेत. त्यांनी केवळ खडू-फळ्याच्या माध्यमातून ज्ञानदान केले नाही, तर अंबाजोगाईचा सांस्कृतिक इतिहास आणि निसर्गसंपदा जपण्याचे मोलाचे कार्य गेल्या अनेक दशकांपासून अविरतपणे केले आहे. आपल्या जीवनातील कठीण आर्थिक परिस्थितीवर मात करत आणि कष्टाचे महत्त्व जाणत निकम यांनी समाजपरिवर्तनासाठी दिलेले योगदान हे जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात मैलाचा दगड ठरले आहे.
रत्नाकर निकम यांचा प्रवास हा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा वस्तुपाठ आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रत्नाकर यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी कधी कॅसेटच्या दुकानात काम केले तर कधी भर उन्हात रस्त्यावरील मैलाच्या दगडांना रंग देण्याचे कष्टाचे काम केले. या संघर्षातूनच त्यांच्यातील संवेदनशील कलाकार आणि आदर्श शिक्षक घडला. शाळेतील शिक्षकांनी दिलेले ‘रजनी’ हे नाव सार्थ ठरवत त्यांनी आपल्या कतृत्वाचा प्रकाश चहूकडे पसरवला. त्यांनी केवळ ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची लाट शिक्षणात आणली नाही, तर विद्यार्थ्यांशी असलेले नाते जिवंत ठेवले.
निसर्ग आणि इतिहासाप्रती असलेली त्यांची ओढ केवळ छंदापुरती मर्यादित राहिली नाही. अंबाजोगाईत झालेल्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन असो वा ‘येस’ (YES) संस्थेच्या माध्यमातून केलेली पर्यावरण चळवळ असो, निकम यांचा सहभाग मोलाचा राहिला आहे. त्यांनी अंबाजोगाईतील ऐतिहासिक स्थळे आणि दुर्मीळ पक्ष्यांचे आपल्या कॅमेऱ्यातून जे दस्तऐवजीकरण केले, ते ‘भोवताल’ या पुस्तकाच्या रूपाने समाजासमोर आले आहे. त्यांच्या या कार्यामुळे अंबाजोगाईचा समृद्ध सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे.
कौटुंबिक पातळीवरही त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. ‘मुलगा हवाच’ या सामाजिक मानसिकतेच्या विरोधात जात त्यांनी आपल्या दोन मुलींना उच्चशिक्षित करून मुला-मुलींमधील भेदाला कायमची मूठमाती दिली. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या निकम सरांचा हा प्रवास संपलेला नसून तो आता एका नव्या वळणावर आहे. शासनाच्या कागदोपत्री ते निवृत्त होत असले तरी, अंबाजोगाई आणि परिसराच्या विकासासाठी, निसर्ग संवर्धनासाठी आणि समाजमंथनासाठी ते यापुढेही कार्यरत राहतील, असा विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.