Breaking

भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला; ‘फायटर’ने डोक्यात वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न

Updated: एप्रिल 13, 2026

By Vivek Sindhu

भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला; 'फायटर'ने डोक्यात वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: तालुक्यातील ठाकर आडगाव येथे जुन्या वादातून सख्ख्या भावानेच भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, आरोपीने दारूच्या नशेत आपल्या भावाच्या डोक्यात ‘फायटर’ने गंभीर वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात आरोपी सिद्धार्थ शहादेव पटेकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महेश शहादेव पटेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाऊ सिद्धार्थ याला दारूचे व्यसन असून तो वारंवार गावात भांडणे करत असतो. याच कारणावरून महेश त्याच्याशी बोलत नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता. घटनेच्या दिवशी महेश गावातील चौकाकडे जात असताना आरोपीने मोटारसायकलवरून येत “तू माझ्याकडे रागाने का बघतोस?” असे म्हणत वाद उकरून काढला. सुरुवातीला शिवीगाळ आणि हाताने मारहाण केल्यानंतर आरोपीने घरातून लोखंडी ‘फायटर’ आणले आणि “तुला जिवे मारून टाकतो” अशी धमकी देत महेशच्या डोक्यात प्रहार केला.

या भीषण हल्ल्यात महेश गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते. आरोपीच्या भीतीमुळे गावातील कोणीही मदतीला धावले नाही, मात्र आरोपीची पत्नी विद्या पटेकर आणि आई रामकवर पटेकर यांनी मध्यस्थी करत आरोपीला तेथून बाजूला नेले. जखमी महेशवर गेवराई येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तलवाडा पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील दिलीप कोळी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts