Breaking
Updated: एप्रिल 1, 2026
आठवडाभरात दुसरी घटना; अल्पवयीन मुलांच्या विकृत मानसिकतेने जिल्हा सुन्न
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील एका गावात एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मंगळवार, ३१ मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली असून, याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी एका १३ वर्षीय शाळकरी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठवड्याभरापूर्वीच डोंगर पिंपळा येथे एका १५ वर्षीय मुलाने आपल्याच नात्यातील चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच, ही दुसरी घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित चिमुरडी आपल्या घरामागील मोकळ्या मैदानात गेली होती. यावेळी गावातीलच आरोपी अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत चिमुरडीला गंभीर दुखापत झाली असून, पीडितेच्या आईने बुधवारी १ एप्रिल रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर
बर्दापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६५(२) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांकडून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.
चिंतेची बाब म्हणजे, मागील आठवड्यातच डोंगर पिंपळा येथे एका १५ वर्षीय मुलाने अश्लील चित्रफित पाहून आपल्याच नात्यातील अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले होते. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच जवळगावमध्ये ही दुसरी घटना घडल्याने पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत कमी वयातील मुले अशा प्रकारच्या गंभीर गुन्हेगारीकडे आणि विकृत मानसिकतेकडे का वळत आहेत, हा प्रश्न आता समाजमन पोखरत आहे. या घटनांमुळे मुलांच्या संगोपनावर आणि मोबाईलमुळे त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारांबद्दल सामाजिक स्तरावर मोठ्या चर्चेला उधाण आले आहे.