Breaking
Updated: एप्रिल 1, 2026
आंबा पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: तालुक्यात बुधवारी दुपारी ५:०० वाजण्याच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन विजेच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी आणि भाजीपाला उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाने जनजीवन विस्कळीत झाले असून ऐन काढणीच्या हंगामात पावसाने घाला घातल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
दुपारी आलेल्या या जोरदार पावसाने आणि वाऱ्याने केज परिसरातील आंबा बागांना मोठा तडाखा दिला आहे. वाऱ्याच्या वेगामुळे झाडांवरील छोट्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात जमिनीवर गळून पडल्या असून बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. केवळ फळबागाच नव्हे, तर शेतातील फळभाज्या आणि पालेभाज्यांचेही या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याऐवजी या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली असून वर्षभराची मेहनत डोळ्यादेखत मातीमोल झाल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.