Breaking
Updated: एप्रिल 1, 2026
आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, वसतिगृह इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी शासनाकडून ३ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या कामासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता, त्यांच्या या प्रयत्नांना आता मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने ३० मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांसाठी राज्य शासनाने एकूण २० कोटी २० लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीमध्ये प्रामुख्याने अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्या वसतिगृह विस्ताराचा समावेश असून, यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. आ. नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाईतील कृषि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने आग्रह धरला होता. त्यांच्या या विशेष प्रयत्नांमुळेच विद्यापीठाच्या इतर कामांसोबत अंबाजोगाईच्या प्रकल्पाला प्राधान्याने निधी मिळाला आहे. केंद्र सरकारच्या ‘अॅग्रिस्टॅक’ योजनेच्या अंमलबजावणीनंतर मिळालेल्या विशेष अर्थसहाय्यातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आ. नमिता मुंदडा यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले असून, यामुळे अंबाजोगाईच्या शैक्षणिक वैभवात भर पडणार असल्याचे प्रतिपादन केले आहे.