Breaking
Updated: एप्रिल 1, 2026
६६५ कोटींच्या ठेवी जमवत सव्वापाच कोटींचा निव्वळ नफा - चेअरमन राजकिशोर मोदी यांची माहिती
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ३१ मार्च २०२६ अखेर १०३२ कोटी रुपयांचा एकूण बँकिंग व्यवसाय पूर्ण केला आहे. बँकेने या वर्षात ६६५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या असून, अत्यंत शिस्तबद्ध नियोजनामुळे शून्य टक्के नेट एनपीए राखण्यात यश मिळवले आहे. या आर्थिक वर्षात बँकेला ५ कोटी २६ लक्ष रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. अंबाजोगाईसह महाराष्ट्रभरातील २३ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांनी दर्शवलेला विश्वास आणि कर्मचाऱ्यांचे सांघिक कार्य यामुळेच हे शिखर गाठणे शक्य झाले आहे.
बँकेच्या या देदीप्यमान यशामागे दिवंगत लोकनेते विलासरावजी देशमुख, दिवंगत लोकनेते अजितदादा पवार, दिवंगत लोकनेते बाबूरावजी आडसकर तसेच माजी कृषिमंत्री आमदार धनंजयजी मुंडे आणि माजी आमदार अमरसिंहजी पंडित यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आवर्जून नमूद केले आहे. मार्च २०२६ अखेर बँकेची एकूण सभासद संख्या १३ हजार १५८ इतकी असून, बँकेने ३६९ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. बँकेचे भागभांडवल २१ कोटी रुपये असून स्वनिधी ५४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच बँकेची एकूण गुंतवणूक ३५० कोटी रुपये असून सर्व ठेवींना पूर्णतः विमा संरक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत बँकेच्या व्यवसायात १३० कोटी रुपयांची मोठी वाढ झाली असून स्थापनेपासून बँकेने आपला ‘अ’ ऑडिट वर्ग कायम राखला आहे.
शून्य टक्के नेट एनपीएचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकेच्या वसुली विभागाने अत्यंत समाधानकारक काम केले आहे. सध्याच्या आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतही पारदर्शक व्यवहारांमुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम राहिली आहे. या यशात बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सन्माननीय सदस्य प्रा. वसंतराव चव्हाण, ॲड. विष्णुपंत सोळंके, पुरुषोत्तम चोकडा, सुरेश मोदी, ॲड. सुधाकर कराड, संकेत मोदी, शेख दगदुभाई शेख दावल, सुधाकर विडेकर, प्रकाश लखेरा, हर्षवर्धन वडमारे, श्रीमती वनमाला रेड्डी, सौ. स्नेहा हिवरेकर, सुनील राजपुरोहित, सचिन बेंबडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
बँकेचा प्रवास १९९६ मध्ये एका छोट्या शाखेपासून सुरू झाला होता, जो आज बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांपर्यंत विस्तारला आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने नुकत्याच केज, मुरूड आणि निलंगा येथे नवीन शाखा कार्यान्वित झाल्या असून एकूण २३ केंद्रांद्वारे बँक सेवा देत आहे. केवळ बँकिंगच नव्हे, तर रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून बँकेने आपली सामाजिक बांधीलकीही जपली आहे. आगामी काळातही हाच विश्वास कायम राखून अधिक सक्षम सेवा देण्याचा संकल्प बँकेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.