Breaking
Updated: एप्रिल 1, 2026
दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन परस्पर गुन्हे दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा: बीड जिल्ह्यातील अंमळनेर येथे रामनवमी निमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमात फोटो काढण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप करत तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत.
पहिली फिर्याद अनिल विजयलिंग हडतगुणे यांनी दिली आहे. हडतगुणे हे २६ मार्च रोजी श्रीराम मंदिरात कीर्तन संपल्यानंतर महाराजांसोबत मुलांचे फोटो काढत होते. त्यावेळी गावातील सोमनाथ श्रीपती गाडे याने फोटो काढण्यास सांगितले, मात्र जुन्या वादामुळे हडतगुणे यांनी फोटो काढण्यास नकार दिला. याचा राग धरून सोमनाथ गाडे, गोविंद श्रीपती गाडे, अक्षय सुरेश गाडे, बाळू अशोक कुऱ्हाडे, सुंदर सुरेश गाडे, निखिल नवनाथ गाडे, सुरेश गाडे आणि सुदर्शन सुरेश गाडे यांनी लाकडी दांड्याने हडतगुणे व त्यांचे मित्र अभिमन्यू पाथरुडकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पाथरुडकर यांचा हात फ्रॅक्चर झाला असून हडतगुणे यांच्या कपाळावर गंभीर जखम झाली आहे.
दुसरी फिर्याद गोविंद श्रीपती गाडे यांनी दिली आहे. गाडे यांची आई गावची सरपंच असून, अनिल हडतगुणे याने मंदिरात त्यांच्या भावाला ‘मांगट्या’ म्हणून जातीयवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या वादाचा वचपा काढण्यासाठी सोमनाथ दिलीप पांगरे, अनिल हडतगुणे, महेश हडतगुणे, अभिमन्यू पाथरुडकर आणि उद्धव रामभाऊ पवार यांनी गोविंद यांची मोटारसायकल अडवून त्यांना लोखंडी गजाने व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गोविंद गाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्ण कांतिलाल चव्हाण आणि पोलीस उप-अधीक्षक बाळकृष्ण जनार्दन हनपुडेपाटील करत आहेत.