Breaking

धनादेश अनादर प्रकरणी मुकादमाला एक वर्ष कारावास आणि आठ लाखांचा दंड; अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल

Updated: मार्च 30, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी एका महत्त्वपूर्ण निकालात, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची फसवणूक करणाऱ्या प्रकाश भीमराव पवार या आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि ८ लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ऊस पुरवठ्याच्या कराराचा भंग करून कारखान्याची थकीत रक्कम देण्यासाठी दिलेला ४ लाख ५४ हजार ७१७ रुपयांचा धनादेश बँकेत अपुऱ्या निधीअभावी न वटल्यामुळे हा खटला दाखल करण्यात आला होता. फिर्यादी कारखान्याच्या वतीने ॲड. प्रवीण योगीराज मेटे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि सादर केलेले भक्कम पुरावे ग्राह्य धरून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर क्रमांक ३ यांनी हा दंड आणि कारावासाचा आदेश दिला आहे.

प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, सन २०१०-११ च्या गळीत हंगामासाठी मैंदवाडी तांडा (ता. परळी, जि. बीड) येथील आरोपी प्रकाश भीमराव पवार याने अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यासोबत ऊस तोडणी आणि पुरवठ्याचा करार केला होता. स्वतः वाहन मालक असल्याचे सांगून आरोपीने कारखान्याकडून ३ लाख रुपये उचल म्हणून घेतले होते. करारानुसार संपूर्ण हंगाम ऊस पुरवठा करणे बंधनकारक असतानाही आरोपीने मध्येच काम बंद केले. कारखान्याने वारंवार मागणी केल्यानंतर, आरोपीने २० फेब्रुवारी २०१८ रोजी व्याजासह एकूण ४ लाख ५४ हजार ७१७ रुपयांचा धनादेश कारखान्याला सुपूर्द केला होता. मात्र, हा धनादेश बँकेत जमा केला असता आरोपीच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित झाला.

या फसवणुकीप्रकरणी कारखान्याने कायदेशीर नोटीस बजावूनही आरोपीने थकीत रक्कम भरली नाही, त्यामुळे कारखान्याने न्यायालयात धाव घेतली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी कारखान्याच्या वतीने गोवर्धन पवार आणि लालासाहेब इंगळे या दोन साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. ॲड. प्रवीण योगीराज मेटे यांनी तांत्रिक कायदेशीर बाबी आणि साक्षीदारांचा पुरावा न्यायालयासमोर अत्यंत चपखलपणे मांडला. जर आरोपीने ८ लाख १० हजार रुपयांचा दंड विहित मुदतीत भरला नाही, तर त्याला अधिकचा तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. या निकालामुळे साखर कारखान्यांची उचल घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


Categories

Recent Posts