Breaking
Updated: मार्च 30, 2026
दारूसाठी पैसे नाकारल्याने भावावर कुऱ्हाडीने हल्ला; वाहेगाव येथील घटना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: “मला दारू पिण्यासाठी पैसे का देत नाहीस?” असे म्हणून एका तरुणाने आपल्याच सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वाहेगाव (आमला) येथे घडली आहे. याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अरुण सीताराम खेत्रे (वय ३०, रा. वाहेगाव आमला) हे हॉटेल व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी, २८ मार्च २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते आपल्या घरासमोर असताना त्यांचा भाऊ रामप्रसाद सीताराम खेत्रे हा दारू पिऊन तेथे आला. त्याने अरुण यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, अरुण यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने रामप्रसाद संतापला आणि त्याने भांडणाची कुरापत काढली.
रागाच्या भरात रामप्रसादने अरुण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि स्वतःजवळील कुऱ्हाडीने अरुण यांच्या डोक्यात जोरात प्रहार केला. या हल्ल्यात अरुण गंभीर जखमी झाले असून आरोपीने त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. जखमी अरुण खेत्रे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी रामप्रसाद सीताराम खेत्रे याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कोरडे करत आहेत