Breaking
Updated: मार्च 30, 2026
'ज्युनिअर आयएएस' परीक्षेत राज्यात प्रथम
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: लातूर येथील संस्कार प्रकाशनच्या वतीने आयोजित ‘ज्युनिअर आयएएस’ (Jr.IAS) राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत अंबाजोगाई येथील प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. वैष्णवी संजय भोसले हिने ३०० पैकी २६२ गुण मिळवून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा शोध घेण्यासाठी आणि भविष्यातील आयएएस, आयपीएस तसेच नीट व जेईई सारख्या परीक्षांची पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने सलग १५ वर्षांपासून ही परीक्षा घेतली जाते. वैष्णवीने मिळवलेल्या या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात तिचे विशेष कौतुक होत आहे.
वैष्णवी ही नर्सरीपासून प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, तिची जिज्ञासूवृत्ती, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यामुळे तिने यशाचे हे उत्तुंग शिखर गाठले आहे. शाळेतच तिची या स्पर्धा परीक्षेची तसेच फाउंडेशन कोर्सेसची सखोल तयारी करून घेण्यात आली होती. या यशासाठी तिला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली कुलकर्णी यांच्यासह प्रज्ञा रामदासी, इंदू मुंडे, सारिका रोडे, शीला थोरात, अबोली कंगळे आणि मंजुश्री शिंदे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
वैष्णवी ही अंबाजोगाई येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा श्री योगेश्वरी देवी देवल कमिटीचे विश्वस्त संजय भोसले यांची कन्या आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या वतीने वैष्णवी व तिच्या पालकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. भविष्यात सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वैष्णवीने मिळवलेले हे यश अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.