Breaking

हुंड्यासाठी गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या नराधम पतीला मरेपर्यंत जन्मठेप

Updated: मार्च 30, 2026

By Vivek Sindhu

हुंड्यासाठी गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या नराधम पतीला मरेपर्यंत जन्मठेप

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

खटला मागे घेण्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर नाकारणाऱ्या स्वाभिमानी पित्याचा लढा यशस्वी

परळी: तालुक्यातील आचार्य टाकळी येथे हुंड्यासाठी तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या जगन्नाथ संदीपान आचार्य याला अंबाजोगाईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश डॉ. रचना आर. तेहरा यांनी सोमवारी हा ऐतिहासिक निकाल दिला. या खटल्यात मयत मनीषा हिच्या सासू आणि सासऱ्यालाही छळवणूक आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली असून, सहा वर्षांपासून न्यायासाठी झगडणाऱ्या एका बापाचा स्वाभिमानी संघर्ष आज फळाला आला आहे.

inshot 20260330 1934030106272426567006039254

याबाबत अधिक माहिती अशी की, पाडोळी येथील मनोहर साहेबराव काळे यांची मुलगी मनीषा हिचा विवाह १७ फेब्रुवारी २०१९ रोजी आचार्य टाकळी येथील जगन्नाथ आचार्य याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नात १५ तोळे सोने आणि संसारोपयोगी वस्तू देऊनही अवघ्या चार महिन्यांतच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवला. पती जगन्नाथ याने कार घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी सुरू केली, तर सासू संजीवनी आणि सासरे संदीपान यांनी लग्नात सासूला सोन्याची अंगठी का घातली नाही, या कारणावरून मनीषाचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. ५ ऑगस्ट २०२० रोजी मनीषाचा मृतदेह तिच्या सासरी संशयास्पद स्थितीत आढळला. कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून तिचा खून करण्यात आला होता. मात्र, आरोपींनी मनीषाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. परंतु, मनीषाचे वडील मनोहर काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना मुलीच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले. तोंडातून येणारा फेस आणि संशयास्पद हालचाली पाहून त्यांनी मुलीच्या हत्येचा संशय व्यक्त केला. शवविच्छेदन अहवालात मनीषाच्या डोक्यात आणि छातीवर अंतर्गत गंभीर जखमा झाल्याचे निष्पन्न झाले, ज्या मारहाणीमुळे झाल्या होत्या. विशेष म्हणजे, ज्यावेळी मनीषाचा अंत झाला, त्यावेळी ती तीन महिन्यांची गरोदर होती, तरीही नराधम पतीला तिची दया आली नाही. सदर फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर कलम ३०२, ३०४-बी, ४९८-अ आणि २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरिक्षक पुरी यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

inshot 20260330 1934417201552791599753784332

या प्रकरणाची सुनावनी न्या. रचना तेहरा यांच्या न्यायालयासमोर झाली. सरकारी अभियोक्ता ॲड. शिवाजीराव मुंडे यांनी या प्रकरणात आठ साक्षीदार तपासले आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा गुन्हा न्यायालयात सिद्ध केला. न्यायालयाने आरोपी पती जगन्नाथ याला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, सासरे संदीपान आणि सासू संजीवनी यांना छळ आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी ठोठावण्यात आली. विशेष म्हणे मुख्य आरोपी पती जगन्नाथ हा गुन्हा दाखल झाल्यापासून आजतागायत कारागृहामध्येच आहे.

पित्याचा सहा वर्षांचा लढा यशस्वी
हा खटला केवळ एका गुन्ह्याचा निकाल नसून एका पित्याच्या स्वाभिमानाचा विजय ठरला आहे. माजलगाव येथील साखर कारखान्यात कर्मचारी असलेल्या मनोहर काळे यांना खटला मागे घेण्यासाठी आरोपींकडून एक कोटी रुपयांची मोठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, आपल्या पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचा सौदा करण्यास त्यांनी ठाम नकार दिला आणि न्यायालयीन लढाई सुरू ठेवली. या निकालामुळे हुंडाबळी घेणाऱ्या आणि विवाहितांचा छळ करणाऱ्या प्रवृत्तींना समाजात एक मोठा संदेश गेला असून, मयत मनीषा आणि तिच्या झगडणाऱ्या पित्याला सहा वर्षांनंतर खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.


Categories

Recent Posts