Breaking
Updated: मार्च 28, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवाबदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या अंबाजोगाई येथील भव्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अत्यंत उत्साहात पार पडले. या सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा जनसेवेचा आपला दृढ संकल्प व्यक्त केला आहे. या कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेच्या अडीअधचणी स्थानिक पातळीवरच सुटण्यास मदत होणार असून, विकासाच्या प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. अंबाजोगाई हे पंकजा मुंडे यांचे आजोळ असल्याने या ठिकाणच्या कार्यालयाचे उद्घाटन अत्यंत भावूक वातावरणात पार पडले. या उद्घाटन सोहळ्याला जिल्हयातील विविध भागांतून आलेले हजारो कार्यकर्ते आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर भागात हे भव्य संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. अंबाजोगाई येथील ॲड. शिवाजीराव कराड यांच्या कुटुंबाशी पंकजा मुंडे यांचा कौटुंबिक स्नेह आहे. कराड यांच्या व्यावसायिक इमारतीत हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. यासाठी गणेश कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला. शनिवारी या कार्यालयाचा लोकार्पण समारंभ पार पडल. यावेळी.पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात जनतेशी असलेल्या भावनिक नात्यावर विशेष भर दिला. “सत्ता असो वा नसो, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

हे कार्यालय केवळ एक इमारत नसून सामान्य माणसाच्या तक्रारींचे आणि गाऱ्हाण्यांचे निवारण करण्याचे केंद्र असेल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आपल्या भाषणात ग्रामीण विकास मंत्री असताना केलेल्या कामांचा आवर्जून उल्लेख केला. रेल्वे प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींचे काम यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असून ही प्रक्रिया भविष्यातही सुरूच राहील असे त्यांनी सांगितले. आता सामान्यांना आपल्या लहान कामांसाठी मुंबई किंवा परळीची वाट पाहावी लागणार नाही, तर त्यांचे प्रश्न याच कार्यालयामार्फत मार्गी लागतील, असे आश्वासन त्यांनी दिले. पंकजा मुंडे यांनी आगामी काळात बीड जिल्ह्यासह राज्यातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणीही अशाच प्रकारची जनसंपर्क कार्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या कामांना गती देणे आणि ‘जनता दरबार’च्या माध्यमातून लोकांच्या समस्या थेट जाणून घेणे हे या कार्यालयाचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

युवा नेते अक्षय मुंदडा यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना त्यांना विकासाचे खरे प्रतीक म्हटले. मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा पंकजा ताई समर्थपणे पुढे नेत असून, हे कार्यालय तरुणांच्या समस्यांचे निवारण केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी युधाजित पंडित आणि गेवराईच्या नगराध्यक्षा गीता पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी अंबाजोगाईच्या मातीतील संस्कारांनी आपल्याला घडवल्याचे सांगत पवार यांनी पंकजा मुंडे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी आपल्या भाषणात या कार्यालयाला ‘जनतेच्या विश्वासाचे केंद्र’ म्हटले. पंकजा मुंडे यांच्या मंत्री पदाच्या काळात झालेल्या अकरा हजार कोटींच्या विकासकामांचा उल्लेख करून त्यांनी जिल्ह्यातील पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला. या सोहळ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे चित्र अंबाजोगाईत पाहायला मिळाले.


