Breaking
Updated: मार्च 27, 2026
ऍड.इस्माईल गवळी व शेख रमीज यांच्यावर दाखल केलेला ३५३ चा खोटा गुन्हा रद्द करा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालय व महाविद्यालय, अंबाजोगाई येथील एम.एस.एफ सुरक्षा रक्षकांवर कारवाई करून ऍड.इस्माईल गवळी व शेख रमीज यांच्यावर दाखल केलेला ३५३ चा खोटा गुन्हा रद्द करावा अशी मागणी लोकविकास महाआघाडी आणि सर्वपक्षीय नेते व प्रमुख कार्यकर्ते यांनी अपर पोलीस अधिक्षक, अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांना शुक्रवारी निषेध मोर्चा काढून दिलेल्या निवेदनातून केली आहे. ऍड.इस्माईल गवळींसाठी सर्वपक्षीय नेते एकवटल्याचे दिसून आले. यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.
खोटे दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी शुक्रवार, दिनांक २७ मार्च रोजी सदर बाजार चौकातून निघून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. खोटे गुन्हे मागे घ्या, दवाखाना वाचवा अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी लोकविकास महाआघाडी, अंबाजोगाई आणि सर्वपक्षीय नेते व प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालयातील सुरक्षा रक्षक एका रिक्षा चालकास मारत असताना अंबाजोगाई शहरातील विधी तज्ज्ञ तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड.इस्माईल गवळी हे त्या ठिकाणी सोडवायला गेले असता त्यांना १५ सुरक्षा रक्षकांनी रिंगण करून बेदम मारहाण केली. त्याचबरोबर सोडवायला गेलेल्या रमीज सर व या मारहाणीचा व्हिडिओ काढणारे पवार यांनाही सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली. सदरील मारहाण प्रकरणात ऍड.इस्माईल गवळी यांना सुरक्षा रक्षकाकडून गंभीर इजा पोचली आहे. असे असताना ही उलट ज्यांना मारहाण झाली त्या ऍड.इस्माईल गवळी व शेख रमीज यांच्यावरच ३५३ चा गुन्हा दाखल केला आहे. याचा आम्ही लोकविकास महाआघाडीच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करीत आहोत. व सोबतच या घटनेच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे मागणी करीत आहोत की, १) ऍड.इस्माईल गवळी, रमीज सर व या मारहाणीचा व्हिडिओ काढणारे पवार यांना अमानुष मारहाण करणाऱ्या १५ सुरक्षा रक्षकांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे., २) ऍड.गवळी व शेख रमीज यांची कोणतीही चूक नसताना उलट त्यांच्यावर दाखल केलेला ३५३ चा खोटा गुन्हा तात्काळ रद्द करावा., ३) स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयाचे आधिष्ठाता यांची तात्काळ बदली करावी. सदरील गंभीर प्रकरणाची दखल घेत वरील मागण्या मान्य करीत तातडीने कारवाई न झाल्यास सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची आपण नोंद घ्यावी असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील निवेदनाच्या प्रति १) अपर जिल्हाधिकारी, २) अपर पोलीस अधिक्षक आणि ३) उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देताना निवेदक राजकिशोर मोदी (नेते – लोकविकास महाआघाडी.), पृथ्वीराज साठे (माजी आमदार, केज विधानसभा, मतदार संघ.), दिनेश भराडीया (उपनगराध्यक्ष, नगरपरिषद, अंबाजोगाई.), सय्यद ताहेरभाई (गटनेता – लोकविकास महाआघाडी, नगरपरिषद, अंबाजोगाई.), हाजी इस्माईल गवळी (ज्येष्ठ नगरसेवक), सुनिल जगताप (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), महेंद्र निकाळजे (रिपाइं-आठवले गट), भिमराव सरवदे (बीड जिल्हा कार्याध्यक्ष, भिमशक्ती), राजेश वाहुळे (मराठवाडा युवा अध्यक्ष, लोकजनशक्ती पार्टी-रामविलास), अशोक पालके (संस्थापक अध्यक्ष, युवा आंदोलन) तसेच नगरसेवक मालू जोगदंड, आकाश कराड, नजीर उमरदराजखान पठाण, बशीरा शफीक सय्यद, शेख शिरीन अशफाक आणि सौ.सोनीताई दत्तात्रय सरवदे यांच्या स्वाक्षर्या आहेत. तर मोर्चात मारूफ बाबा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, शिवसेनेचे मदनलाल परदेशी, शेख रमीज सर, शेख मुक्तार, कल्याण भिसे, सचिन जोगदंड, मोईन शेख, रौफ बिल्डर, सचिन जाधव, दत्ताभाऊ सरवदे, सुनील वाघाळकर, समाजवादी पार्टीचे जिलानी, जावेद गवळी, हमीद चौधरी, ऍड.शारेख अली उस्मानी, धीमंत राष्ट्रपाल, महेबूब गवळी हे सहभागी झाले होते.