Breaking

आष्टीजवळ कंटेनर उलटून चालकाचा जागीच मृत्यू, ट्रॅव्हल्सने ‘कट’ मारल्याने भीषण दुर्घटना

Updated: मार्च 25, 2026

By Vivek Sindhu

आष्टीजवळ कंटेनर उलटून चालकाचा जागीच मृत्यू, ट्रॅव्हल्सने 'कट' मारल्याने भीषण दुर्घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील कारखेल खुर्द (ता. आष्टी) येथे सोमवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये चालक ज्ञानदेव गर्जे (वय 24) याचा जागीच मृत्यू झाला.

पुण्याहून लोखंडी सळ्या घेऊन लातूरकडे जाणाऱ्या कंटेनरला एका खासगी ट्रॅव्हल्सने ‘कट’ मारल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर रस्त्यावर उलटला. या दुर्दैवी घटनेत चालकाचा सहकारी प्रवीण सोनवणे हा सुदैवाने किरकोळ जखमी झाला असून, भरधाव ट्रॅव्हल्सच्या निष्काळजीपणामुळे एका तरुण चालकाला आपला प्राण गमवावा लागला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, ताबा सुटलेला कंटेनर थेट रस्त्यालगत असलेल्या घरांच्या दिशेने झेपावला आणि घरासमोरील ओटे, पत्रे व झाडांना जोरात धडक देऊन थांबला. ज्या वेळी ही घटना घडली, तेव्हा घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते. मात्र कंटेनर घराच्या भिंतींना भेदून आत शिरला नसल्याने एक मोठा अनर्थ टळला. सुदैवाने, घरांचे किरकोळ नुकसान झाले असले तरी चार कुटुंबांतील सदस्यांचे नशीब बलवत्तर असल्यामुळे या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे हवालदार हरिभाऊ बांगर, शिवदास केदार, अमोल शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला. महामार्गावरील वाढत्या वेगामुळे अशा घटना घडत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, मृत ज्ञानदेव गर्जे हा मूळचा आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील रहिवासी असून तो मालवाहतूक वाहनावर चालक म्हणून काम करत होता.


Categories

Recent Posts