Breaking
Updated: मार्च 25, 2026
बीडमधील ३ सराईत गुन्हेगार तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: जिल्हयात चोऱ्या आणि घरफोड्या करून सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांवर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मोठी कारवाई केली आहे. या गुन्हेगारांना बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश आज २५ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. या टोळीमध्ये टोळीप्रमुख भिमा लक्ष्मण मस्के, अविनाश कल्याण धुरधेरे आणि विपुल उत्तम गायकवाड यांचा समावेश असून, हे तिन्ही आरोपी पेठ बीड परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर चोरी, दिवसा व रात्री घरफोडी करणे, टॉवरच्या बॅटरी चोरणे आणि कॉपर वायरची चोरी करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बीड जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. पेठ बीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मारोती खेडकर यांनी या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केला होता. या प्रस्तावावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण केल्यानंतर, पोलीस अधीक्षकांनी आरोपींना १३ आणि २४ मार्च रोजी त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. मात्र, आरोपी या सुनावणीस गैरहजर राहिले. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि लोकांच्या मालमत्तेस असलेला धोका विचारात घेऊन ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वी केली आहे. जिल्हयात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध आगामी काळातही एमपीडीए, मोक्का आणि हद्दपारी यांसारख्या कठोर कारवाया सुरूच राहतील, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या निमित्ताने दिला आहे.