Breaking

कर्जनी गावात प्रशासनाविरुद्ध एल्गार: ५० वर्षांपासूनची घरे पाडण्याच्या नोटिशीमुळे ग्रामस्थ आक्रमक,

Updated: मार्च 20, 2026

By Vivek Sindhu

कर्जनी गावात प्रशासनाविरुद्ध एल्गार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

तलावाचा सांडवा फोडण्याचा इशारा

बीड जिल्ह्यातील कर्जनी गावात गेल्या पन्नास वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांच्या घरांवर वन विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुनर्वसनाच्या नावाखाली हक्काच्या जमिनी दिल्यानंतर गायरान जमिनीवर स्थायिक झालेल्या नागरिकांना आता वन विभागाने घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या असून, या अन्यायाविरोधात शिवसेना आणि गुजर समाजाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर प्रशासनाने बळाचा वापर करून गरिबांची घरे पाडली, तर धरणाचा सांडवा फोडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या संघर्षाची मुळे ५५ वर्षांपूर्वीच्या धरण प्रकल्पात दडलेली आहेत. शासनाने तलाव बांधकामासाठी ग्रामस्थांच्या जमिनी अधिग्रहित केल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनानेच ग्रामस्थांना गायरान जमिनीवर घरे बांधण्यास सांगितले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डोंगराचा भाग समतल करून आणि रक्ताचे पाणी करून गावकऱ्यांनी ही घरे उभारली. मात्र, आता अचानक वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल होऊन ही जमीन वन विभागाची असल्याचा दावा करत आहेत. “येथील सर्व बांधकामे तात्काळ काढून टाका, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा सज्जड दम अधिकाऱ्यांकडून दिला जात असल्याचे पीडित ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वर्षानुवर्षे तिथे राहणाऱ्या कुटुंबांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. या प्रश्नावर शिवसेना जिल्हा संघटक तथा गुजर समाज जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्या नागरिकांनी धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या, त्यांच्यावरच आज बेघर होण्याची वेळ आली आहे. जर प्रशासनाने सामोपचाराने प्रश्न न सोडवता घरांवर नांगर फिरवण्याचा प्रयत्न केला, तर तलावाचा सांडवा फोडल्याशिवाय समाज बांधव शांत बसणार नाहीत. हा लढा केवळ घरांचा नसून तो अस्तित्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनाच्या इशाऱ्यावेळी गुजर समाज जिल्हा उपाध्यक्ष अशोक घुशीर, जिल्हा संघटक अरुण नाना खटाने, सुनील बहिरवाळ, गजानन बहिरवाळ, राजाभाऊ गुजर, तालुका अध्यक्ष शहादेव डोंगर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने या संवेदनशील विषयात लक्ष घालून ग्रामस्थांशी संवाद साधावा आणि त्यांच्या हक्काच्या घरांवरील कारवाई थांबवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, बीड जिल्ह्यात एक मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Categories

Recent Posts