Breaking

जातीच्या नावावर पेटणाऱ्या बीडमध्ये शेतकऱ्यांच्या वेदनांसाठी गर्दी का होत नाही?

Updated: मार्च 20, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image१ 2026 03 20 at 12.30.08 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजी राज्यमंत्री बच्चू कडूंचा रोखठोक सवाल

अंबाजोगाई: अंबाजोगाई येथे अन्नत्याग आंदोलन अंतर्गत आयोजित शेतकरी सहवेदना पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना माजी राज्यमंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी समाज आणि राजकारण्यांच्या दुटप्पी भूमिकेवर कडक शब्दांत प्रहार केला. बीड जिल्हा सध्या जातीपातीच्या राजकारणाने पेटला असताना, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र कोणीही एकत्र येताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जातीसाठी आणि धर्मासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरतात, पण साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी मात्र साधं सभागृहही भरत नाही, हे महाराष्ट्राचे मोठे दुर्दैव असल्याचे कडू यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढताना आजवर स्वतःवर ८० गुन्हे दाखल झाल्याची माहिती देताना बच्चू कडू भावूक झाले होते. आंदोलनासाठी येतानाही लोक गाडी आणि डिझेलची मागणी करतात, ही वृत्ती शेतकऱ्यांच्या चळवळीला घातक असल्याचे त्यांनी नमूद केले. मेळघाटातील विदारक स्थिती मांडताना त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानंतरही आजही तिथल्या ६० हून अधिक गावांमध्ये वीज आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ‘हर घर जल’च्या घोषणा देणाऱ्या सरकारला आजही मेळघाटातील माणसाच्या तहानेची काळजी नसल्याची टीका त्यांनी केली.

कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकार केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि वेळ मारून नेण्यासाठी कर्जमाफीच्या घोषणा करते. २०१५-१६ च्या थकबाकीदारांना न्याय मिळतो, पण २०२५-२६ मधील चालू कर्जदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार मौन बाळगून आहे. जोपर्यंत शेतकरी स्वतःची जात आणि धर्म विसरून ‘शेतकरी’ म्हणून एकत्र येत नाही, तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही, असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. केवळ सत्ता मिळवण्यासाठी जातीचे राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी काम करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.


Categories

Recent Posts