Breaking
Updated: मार्च 18, 2026
विजयप्रकाश ठोंबरे यांच्यासह लिपिकावर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelविजयप्रकाश ठोंबरे यांच्यासह लिपिकावर गुन्हा दाखल
केज: महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नोकरीधारकांच्या जात वैधता प्रमाणपत्रांचा त्यांच्या संमतीशिवाय वापर करून सूत गिरणीचे बनावट सभासद नोंदवल्याचा गंभीर प्रकार केजमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीचे तत्कालीन अध्यक्ष तथा माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे आणि लिपिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल कचरू तुरुकमारे (वय ५८, रा. बीड) यांनी केज पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांचा २६ वर्षीय मुलगा ऋषिकेश हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून त्याने २०१६-२०१७ मध्ये इयत्ता १२ वी मध्ये असताना केशरबाई क्षीरसागर महाविद्यालयातून जात वैधता प्रमाणपत्र मिळवले होते. ऋषिकेश याच्या प्रमाणपत्राचा क्रमांक ३९६८५ असा आहे.
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीचे तत्कालीन लिपिक राजकुमार दयाराम वाव्हळे (रा. हातोला, ता. अंबाजोगाई) यांनी जिल्हा जात पडताळणी समितीकडून माहिती अधिकारात जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीतील जात वैधता प्रमाणपत्रांची मागणी केली होती. या माहिती अधिकाराद्वारे वाव्हळे यांनी ऋषिकेश याच्यासह एकूण ४६४ अर्जदारांची जात वैधता प्रमाणपत्रे हस्तगत केली.
सूत गिरणीचे तत्कालीन अध्यक्ष विजयप्रकाश किसनराव ठोंबरे (रा. केज) आणि राजकुमार वाव्हळे यांनी संगनमत करून या जात वैधता प्रमाणपत्रांचा बेकायदेशीर वापर केला. त्यांनी ऋषिकेशसह इतर अनेक विद्यार्थी आणि नोकरीधारकांना त्यांची कोणतीही संमती नसताना सूत गिरणीच्या रेकॉर्डवर सभासद म्हणून नोंदवले. ही बनावट यादी प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग, संभाजीनगर यांच्या कार्यालयात देऊन प्रमाणित करून घेतली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पीडितांनी तक्रार केली असता अध्यक्षांनी ऋषिकेशचे नाव असलेली यादी रद्द केली.
या प्रकरणी केज पोलिसांनी विजयप्रकाश किसनराव ठोंबरे आणि राजकुमार दयाराम वाव्हळे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ३४ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश ज्ञानेश्वर निकम करत आहेत.