Breaking
Updated: मार्च 18, 2026
विजयप्रकाश ठोंबरे यांच्यासह लिपिकावर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी: मृत वडिलांचे खोटे ओळखपत्र तयार करून त्यांच्या नावावर असलेली वडिलोपार्जित जमिनीची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आष्टी पोलीस ठाण्यात भावासह आठ जणांविरुद्ध फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किसन कारभारी आंधळे (वय ६४, रा. लिंबोडी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील कारभारी माधव आंधळे यांचे १२ ऑगस्ट २०१४ रोजी निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर आरोपी भाऊ नारायण कारभारी आंधळे याने वडिलांचे बनावट ओळखपत्र तयार केले. तो स्वतः वडील असल्याचे भासवून दुय्यम निबंधक कार्यालय आष्टी येथे मौजे लिंबोडी येथील गट क्रमांक १२१ आणि १०१ मधील जमिनीची खरेदीखते करून इतर आरोपींच्या नावे केली. हा प्रकार २०१५ ते २०२३ या कालावधीत घडला. मयत व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवून आरोपींनी संगनमताने हा कट रचला आणि फिर्यादीच्या कायदेशीर वाट्याची जमीन हडपली.काही दिवसांपूर्वी ७/१२ उतारा काढल्यानंतर किसन आंधळे यांना जमिनीचे क्षेत्र कमी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता ही फसवणूक समोर आली. याबाबत जाब विचारला असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
सुरुवातीला पोलिसांनी तक्रार न घेतल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर आता नारायण आंधळे, अंबादास आंधळे, जिजाबा गर्जे, बाबासाहेब आंधळे, रावसाहेब आंधळे, आजिनाथ आंधळे, राजू आंधळे आणि आप्पादेव आंधळे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर करत आहेत.