Breaking
Updated: मार्च 18, 2026
शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; पगार थांबवल्याने टोकाचे पाऊल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: आपल्या मुलाचा पगार बंद केल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीतून एका ५५ वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे घडली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबुराव गोलाजी उघडे यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांचा ५५ वर्षीय मुलगा कैलास उर्फ बबन बाबुराव उघडे हा जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालय, शिरसदेवी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत होता. मागील काही दिवसांपूर्वी कैलासने आपल्या वडिलांना सांगितले होते की, गोरकर आणि श्रीराम शेळके यांनी त्याचा पगार बंद केला आहे. पगार बंद झाल्यामुळे तो मोठ्या आर्थिक विवंचनेत होता.१४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास कैलासने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यावेळी पोलिसांना दोन चिठ्ठ्या सापडल्या असून, त्यामध्ये गोरकर आणि श्रीराम शेळके यांनी फेब्रुवारी महिन्याचा पगार बंद केल्यामुळेच आपण आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचे कैलासने नमूद केले होते. तसेच हे दोन्ही व्यक्ती आपल्या संसाराला कारणीभूत असल्याचेही चिठ्ठीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून तलवाडा पोलिसांनी आरोपी गोरकर आणि श्रीराम शेळके यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी करत आहेत.