Breaking
Updated: मार्च 18, 2026
अन्नत्याग आंदोलनात निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमात सहभागी व्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन या आंदोलनाचे संयोजक सुदर्शन रापतवार, कालिदास आपेट, आच्चूतबापू गंगणे, वसंतराव मोरे आणि इतरांनी केले आहे.
१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हान येथील साहेबराव करपे, सौ. मालतीताई करपे यांनी आर्थिक विवंचनेतून आपल्या चार लहान मुलांसह सामुहिक आत्महत्या केली होती. या सामुहिक आत्महत्येची शासनदरबारी पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली. तेंव्हापासून आज पर्यंत दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतक-यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलन च्या वतीने गेली आठ वर्षांपासून हा दिवस शेतकरी सहवेदना दिवस म्हणून पाळण्यात येतो व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात येते.
अंबाजोगाई येथे मागील दहा वर्षांपासून १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या ही वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व उपक्रमात शेतकरी पुत्रांना सहभाग आवश्यक आहे.
▪️ सामुहिक उपवास
अन्नत्याग आंदोलन निमित्ताने आयोजित उपक्रमांची सुरुवात नगर परिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहासमोर सकाळी १० वाजता सामुहिक उपवासाने करण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या आद्य कवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहा समोर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली हा सामुहिक उपवास करण्यात येणार आहे.
▪️१०आत्महत्याग्रस्त शेतकरी बहिणींचा सन्मान
याच मुख्य कार्यक्रमात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या १० विधवा पत्नींचा साडीचोळी देवून सन्मान करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्यासाठी कालिदास आपेट यांनी पुढाकार घेतला असून सामाजिक कार्यकर्ते सुभाष बाहेती यांनी ही संकल्पना मुर्त स्वरुपात आणण्यासाठी सहकार्य केले आहे.
▪️ शेतकरी सहवेदना पुरस्कार
देशभरातील शेतकऱ्यांचे आणि कष्टक-यांचे नेते तथा माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना यावर्षीचा “शेतकरी सहवेदना पुरस्कार” देवून सन्मान करण्यात येणार आहे. स्मृती चिन्ह, सन्मान पत्र, शाल आणि गुलाबपुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
▪️ एबीपी माझा च्या कार्यकारी संपादिक सरीता कौशिक यांचे व्याख्यान
या कार्यक्रमात एबीपी माझा च्या कार्यकारी संपादिका सरीता कौशिक मॅडम यांचे “शेतकरी आत्महत्या कारणं आणि मिमांसा” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सरीता कौशिक यांचा स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
सामुहिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम
या संपुर्ण कार्यक्रमानंतर आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीसह सामुहिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथील प्रगतिशील शेतकरी व शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे अभ्यासक अनिरुद्ध चौसाळकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
कळकळीचे आवाहन
१९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम नाही. केवळ देशभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अतिशय संवेदनशील असा विषय घेऊन मागील दहा वर्षांपासून अन्नत्याग आंदोलन निमित्ताने लोकसहभागातून आम्ही हे सर्व उपक्रम राबवत आहोत. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपक्रमात या विभागातील नागरीकांनी उस्त्फु्र्तपणे आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक सुदर्शन रापतवार, अमर हबीब, कालिदास आपेट, आच्चूतबापू गंगणे, ऍड. संतोष पवार, माजी सरपंच वसंत मोरे, प्रा. शांतिनाथ बनसोडे, प्रा. पंडित कराड, गोरख शेंद्रे , अनिरुद्ध चौसाळकर, सुभाष बाहेती, डॉ. सुरेश आरसुडे, अच्चूत गंगणे, मदन परदेशी, संतोष बोबडे, प्रा. शैलजा बरुरे, महावीर भगरे, व्यंकटेश जोशी, इस्माईल शेख, लखन होके, कल्याणराव भगत, रेखा देशमुख, अनिता कांबळे, दत्तात्रय अंबेकर आदिंनी केले आहे.