Breaking
Updated: मार्च 16, 2026
वीज पुरवठा बंद तरीही वाढतेय बील
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील गुरूवार पेठ भागातील एका ग्राहकाला गेल्या अनेक महिन्यांपासून वीज बिल न मिळता, थेट थकबाकी दाखवत असल्याने प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा लेखी स्वरूपात विनंती अर्ज आणि अधिकृत बिल देण्याची मागणी करूनही बिल न दिल्याने या ग्राहकाने संताप व्यक्त केला असून, यामुळे महावितरण कंपनीच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीशी बोलताना समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष राजेश परदेशी यांनी सांगितले की, मीटर रिडींग वेळेवर न घेणे किंवा रिडींग घेऊनही बिल न पाठवल्यामुळे अनेकांना बिल भरता येत नाही. यामुळे अचानक एकाच वेळी मोठ्या रकमेचे सरासरी बिल येते, अशाने सामान्य माणसाचे किती हाल करतेत तसेच गोरगरिबांना हराशमेंट करून लाईट बिल वसुलीचे कारण दाखवून त्या लोकांकडून पैसे वसूल करतात. ज्यामध्ये दंडाची रक्कमही असते. या प्रकारामुळे ग्राहकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असाच काहीसा अनुभव मला ही आला आहे. मला वीज वापराचे अधिकृत बिल देण्यात यावे अशी मागणी मी ८ ऑगस्ट २०२४ पासून आजतागायत पर्यंत करीत आहे. याबाबत मी दिनांक ८ ऑगस्ट २०२४, २१ नोव्हेंबर २०२४, १७ एप्रिल २०२५ आणि २३ जुन २०२५ या विविध तारखांना अर्ज देवून महावितरणच्या अभियंता यांना विनंती केली आहे. तरी परंतु, महावितरणने या प्रकरणी कोणतीही दखल घेतलेली नाही. सदर अर्जांवर काही कार्यवाही सुध्दा केली नाही. उलट दुर्लक्ष केले आहे असे परदेशी यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, महावितरणच्या दप्तर दिरंगाईचा फटका आमच्या सारख्या नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना बसत आहे. वारंवार मागणी करूनही अधिकृत वीज बिल मिळत नसल्याने, दिवसेंदिवस न वापरलेल्या वीज बिलाची थकबाकी वाढत आहे. मी या संदर्भात सातत्याने मागणी करूनही महावितरण अधिकृत बिल देत नाही, त्यामुळे वेळोवेळी मी बिलाची प्रिंट काढून पेमेंट ऑनलाईन पद्धतीने अदा केलेले आहे. माझ्याकडे कोणतीही थकबाकी नसताना व कोणतीही पूर्वसूचना न देता यापूर्वीच अचानक वीज पुरवठा खंडित केला आहे. वीज कनेक्शन बंद असताना ही वीज वापराचे बिल मिळत आहे हा प्रकार अजबच म्हणावा लागेल अशी तक्रार व महावितरणच्या कारभाराविषयी परदेशी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. अवास्तव व भरमसाठ बिल पाहून परदेशी यांना काही दिवसांपूर्वी मोठा मानसिक धक्का बसला आहे. न वापरलेल्या वीजेच्या वाढीव बिलामुळे ते तणावाखाली आहेत. यामुळे आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ही परदेशी यांनी लेखी स्वरूपातील अर्जाद्वारे महावितरणला केला आहे. आम्ही नियमीत वीज बिल भरणा करीत असून व कधीही वीज बिल थकीत ठेवलेले नसताना आम्हांला इतक्या मोठ्या रकमेचे बिल देऊन, मानसिक त्रास तर दिला आहे. त्यामुळे आता आपण महावितरणच्या या भोंगळ, मनमानी कारभाराविरोधात नाराजीने सक्षम प्राधिकरणाकडे रितसर तक्रार दाखल करून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष राजेश परदेशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.