Breaking

महिलांचा गझल मुशायरा अंबाजोगाईत रंगला

Updated: मार्च 16, 2026

By Vivek Sindhu

महिलांचा गझल मुशायरा अंबाजोगाईत रंगला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई – यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाई, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई– जिल्हा केंद्र बीड व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व सुरेश भट गझल मंच पुणे प्रस्तुत महिलांचा गझल मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण यांची जयंती, सुरेश भट यांची पुण्यतिथी व जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या महिलांच्या विशेष मुशायऱ्यामध्ये गझल रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हा मुशायरा वेणूताई चव्हाण महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यात महिला गझलकरांनी आपल्या दर्जेदार गझला सादर करून रसिकांची मनी जिंकली.
सुरुवातीला यशवंतराव चव्हाण, सुरेश भट, भगवानराव लोमटे व गझलकार सतीश दराडे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र संभाजीनगरचे निलेश राऊत, अंबाजोगाई येथील मुक्त पत्रकार व लेखक अमर हबीब, दत्तात्रय पाटील, अनिकेत लोहिया डॉ. नरेंद्र काळे, दगडू लोमटे, प्राचार्य शिवदास शिरसाट व शाहीर सुरेशकुमार वैराळकर हे मंचावर उपस्थित होते.

गझल मुशायरा रंगला
बुलढाणा येथून आलेल्या डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांनी आपल्या गझलेतून समाजाच्या व जगाच्या परस्थितीवर भाष्य करणारी गझल सादर केली.
’विझला कसा कळेना, अंगार चळवळीचा
गेले कुठे निघोनी,
रस्त्यात पेटणारे?’ व
’वेळ आली बघा,युद्ध झाले सुरू,
सिंह सारे अता का, दडू लागले?’
त्यानंतर सेलू येथील गझलकार अश्विनी विटेकर यांनी
’ज्या घटकेला मागे वळले
तिथेच माझे मन डळमळले
’घरात उपऱ्यावाणी जगले’
फक्त्त चार भिंतींना कळले’
ही स्त्री मनाची तगमग आणि घुसमट आपल्या गझलेतून सादर केली. त्यानंतर नांदेड येथून आलेल्या सुहासिनी देशमुख यांनी
’कसा असतो जरा सांगा कुणी या शाप देवाचा?
बघू द्याना कसा असतो, मला संताप देवाचा!’
’जगा धाकात ठेवोनी, स्वतः थाटात आहे तो’
कुणा कळलाच नाही, डाव हा..अद्याप देवाचा’
ही गझल सादर करून विचार करायला भाग पाडले. त्यानंतर पुण्यातून आलेल्या किर्ती वैराळकर यांनी
‘खरे तर वाद दोघांचे तसेही लाजमी होते
कळवूस दुनियेला उगीचच बातमी होते’
’मला तू भेटल्यावरती निसटला तोल का नकळत
तुला भेटायच्या आधी तशी मी संयमी होते’
ही गझल सादर करून रसिकांची माने जिंकली. त्यानंतर तरुण गझलकार श्वेता बरकडे सातारा यांनी
’भरडून रोज निघते जात्यात संयमाच्या
होतील पूर्ण इच्छा केव्हातरी मनाच्या’
’संस्कारशील मुलगी तोवर मला म्हणाले
जोवर मनाप्रमाणे मी वागले जगाच्या’
असा आपल्या जीवनातील अनुभव व निर्भिडपणा दाखवणारी गझल सादर केली. पुसद येथील गझलकार अल्पना नायक देशमुख यांनी
’आज नव्हे तर केव्हा नंतर लागेलच ना
नवे वळण जगण्याला सुंदर लागेलच ना’
’म्हणून जपते आहे गझले तुझी सावली
डोईवर हक्काचे छप्पर लागेलच ना?’
जगण्याची उर्मी जपणारी व आशावादी गझल सादर केली. शेवटी पनवेल येथील ज्येष्ठ गझलकार ज्योत्स्ना राजपूत यांनी आपली रचना सादर केली.
‘टोपलीतल्या कमी भाकऱ्या मोजत असते जेंव्हा
पंगतीतुनी हळू स्वतःला गाळत असते बाई’
’माहेराचे कौतुक असते अन सासंरचा तोरा
दोन चाळण्या मधे स्वतःला चाळत असते बाई’
ही स्त्रियांचं भावीविश्व व्यक्त करणारी गझल सादर केली. या गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी खुमारसदारपणे, कधी गंभीरपणे कधी हास्यविनोदामध्ये रसिक व गझलकार यांच्यात दुवा साधत केले.
सुरुवातीला पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. उपस्थित महिला गझलकार यांचे स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शहरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


Categories

Recent Posts