Breaking

परळीत ‘साई लॉज’वर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत दोन महिलांची सुटका

Updated: जानेवारी 30, 2026

By Vivek Sindhu

परळीत 'साई लॉज'वर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत दोन महिलांची सुटका

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: बीड रोडवरील टोकवाडी येथील ‘साई लॉज’मध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) आणि परळी ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना बाहेर जिल्ह्यांतून बोलावून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईचे नियोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक मझहरअली सय्यद आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद मेंडके यांच्या पथकाने एका बनावट ग्राहकाद्वारे लॉजवर सापळा रचला. संबंधित एजंटने वेश्यागमनासाठी १५०० रुपयांची मागणी करून पैसे स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने छापा टाकला. या मोहिमेत भिवंडी आणि पुणे येथून आणलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांना दत्ता मुंडे नावाच्या व्यक्तीने फोन करून बोलावले होते आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशातील मोठा वाटा आरोपी स्वतः ठेवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी नाशर नशीर शेख या एजंटला रंगेहाथ पकडले असून, लॉजचा मॅनेजर सोमनाथ मुंडे आणि मुख्य सूत्रधार दत्ता मुंडे यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळावरून रोख रक्कम आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्व आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईत उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता.


Categories

Recent Posts