Breaking

धारूर घाटात अरुंद रस्त्यामुळे नेहमीच जीवघेणी वाहतूक कोंडी; रूंदीकरणाचा प्रश्न कधी मार्गी लागणार

Updated: जानेवारी 30, 2026

By Vivek Sindhu

रूंदीकरणाचा प्रश्न कधी मार्गी लागणार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर – खामगाव–पंढरपूर राष्ट्रीय मार्गावरील धारूर घाट ते धुनकवाड पाटीपर्यंतचा अरुंद रस्ता सध्या अपघातांचा सापळा ठरत असून, ऊस वाहतुकीमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्याचे रूंदीकरण तातडीने करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
खामगाव–पंढरपूर हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून मराठवाडा व विदर्भाला जोडणारा हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र धारूर घाटासह धुनकवाड पाटीपर्यंत सुमारे चार किलोमीटर अंतराचा रस्ता अद्याप अरुंद अवस्थेत आहे. विशेष म्हणजे उर्वरित मार्ग सिमेंट काँक्रिटचा व प्रशस्त असताना, घाटातील हा भाग अजूनही अरुंद डांबरी स्वरूपात असून येथे तीव्र वळणे आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे.
मागील दोन महिन्यांपासून येडेश्वरी व केज येथील साखर कारखान्यांना डोंगराळ भागातून उसाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक प्रामुख्याने ट्रॅक्टर व ट्रकच्या माध्यमातून केली जात आहे. एका ट्रॅक्टरला दोन ऊसाने भरलेल्या ट्रॉल्या जोडलेल्या असतात. घाटातील अरुंद रस्ता व तीव्र चढ असल्याने एकाच वेळी दोन ट्रॉल्या नेणे शक्य होत नाही. परिणामी एक-एक ट्रॉली करून वाहतूक केली जात असल्याने घाटात कायम वाहनांची रांग लागलेली दिसते.
या परिस्थितीमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. ट्रॅक्टर किंवा अन्य जड वाहन बिघडल्यास ते बाजूला काढणेही कठीण ठरते. याचा फटका दुचाकी व कार चालकांना मोठ्या प्रमाणावर बसत असून, जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लहान वाहनांना वाट काढताना प्रचंड अडचणी येत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून ही समस्या कायम असून, स्थानिक नागरिक, वाहनचालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला आहे. मात्र रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. राष्ट्रीय महामार्गावर असलेला हा घाट रस्ता तातडीने रूंद व सुरक्षित करण्यात यावा, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.


Categories

Recent Posts