Breaking

जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ अधिकारी ताब्यात

Updated: जानेवारी 18, 2026

By Vivek Sindhu

घातपाताचा संशय, बीडमध्ये खळबळ

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागात राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुण अधिकाऱ्याचा मृतदेह शनिवारी दुपारी सोलापूर-धुळे महामार्गालगत संशयास्पद स्थितीत आढळून आला. सचिन जाधवर असे या ३५ वर्षीय मृत अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांकडून होणाऱ्या जाचाचा उल्लेख करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे महसूल आणि पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर जीएसटी विभागातील एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

सचिन जाधवर (मूळ रा. चुंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे शुक्रवारी सकाळी कार्यालयात जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते, मात्र ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी शोध घेऊनही ते न सापडल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. शनिवारी दुपारी कपिलधार रोडवर एका निर्जन ठिकाणी त्यांची कार उभी असल्याचे दिसून आले. कारची सर्व तावदाने आतून बंद होती. पोलिसांनी कार उघडली असता जाधवर यांचा मृतदेह आढळून आला. कारमध्ये एक मडके आणि त्यात पेटवलेला कोळसा मिळून आला असून, धुरामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊन गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मृत सचिन जाधवर हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी होते. त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयावर पुस्तके लिहिली होती आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत. वरिष्ठांच्या त्रासाबाबत त्यांनी यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संबंधित अधिकाऱ्याची सखोल चौकशी सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts